
देवगड : वसुबारस या दीपावलीच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून ५ नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्यांसाठी गोमातेचे महत्त्व सांगणारा विशेष प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यामध्ये गाय व पशुधनाचे असलेले महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देत गोमातेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात एकूण १२७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
‘गाय–कामधेनू : बदलत्या हवामानाच्या संकटातून शाश्वत भारताच्या पुनर्निर्माणाची भारतीय दिशा’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पशुधन, शेती आणि पर्यावरण यांच्यातील परस्परसंबंधांची माहिती देण्यात आली.
गाय ही केवळ दूध देणारी जनावर नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थांमधून पोषण मिळते, तर शेणाचा उपयोग सेंद्रिय खत, गांडूळखत आणि बायोगॅस निर्मितीसाठी करता येतो. त्यामुळे पशुपालन आणि शेती यांची योग्य सांगड घातल्यास शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करण्यास तसेच जमिनीची सुपीकता टिकविण्यास मदत होऊ शकते, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
बदलते हवामान, अनियमित पर्जन्यमान, वाढते तापमान, पाणी व चारा टंचाई तसेच शेतीवरील वाढता खर्च या पार्श्वभूमीवर पशुधनाचे शास्त्रीय व्यवस्थापन, चारा नियोजन, शेणखत निर्मिती, जैवऊर्जा आणि जलसंधारण यांचे महत्त्वही यावेळी स्पष्ट करण्यात आले. भारतीय परंपरेतील गायपूजनाला वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड देत पशुधन संवर्धन आणि शाश्वत शेतीचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या सुयोगी घाडी होत्या. प्रमुख उपस्थितांमध्ये पंचायत समिती देवगडचे सभापती गणेश राणे, पडेल ग्रामपंचायतीचे सरपंच भूषण पोकळे, अंकुश टूकरूल आणि पंचायत समिती सदस्या संजना लाड यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पडेल येथील मुख्याध्यापक तानवडे सर यांनी केले. स्थानिक पशुधन पर्यवेक्षक सचिन पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. पशुसंवर्धन विभाग, पशुवैद्यकीय चिकित्सालय, देवगड यांच्या माध्यमातून हा प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात आला.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








