
सावंतवाडी : लहान मुलांच्या हातातील मोबाईल आणि त्याच्या अतिवापरामुळे किंवा अन्य कारणामुळे मुलांमध्ये ऑटिझम स्पेक्ट्रम हा आजार बळावत चालला आहे. यामुळे काही मुलांचा बौद्धिक विकासातील प्रवासात संवाद, सामाजिक वर्तन, संवेदनशीलता आणि शिकण्याच्या प्रक्रियेत काही वेगळेपणा जाणवतो.
अशा मुलांना योग्य वेळी योग्य उपचाराची गरज असते. याच सामाजिक जाणिवेतून स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे चेअरमन ॲड. रुजूल पाटणकर यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेत, कोलगाव येथील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ऑटिझम संबंधित अडचणी असलेल्या मुलांसाठी प्रशस्त ऑक्युपेशनल थेरपी सेंटर उभारत तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू केले आहे. जिल्ह्यातील पालकांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ॲड. पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत केले.
ॲड. पाटणकर म्हणाले, ऑटिझम हा संसर्गजन्य आजार नसून मेंदूच्या विकासाशी संबंधित आजार आहे. त्याची लक्षणे बालपणात दिसून येऊ शकतात. मात्र, प्रत्येक मुलामध्ये त्याचे स्वरूप आणि तीव्रता वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येक मुलाकडे त्याच्या वैयक्तिक गरजा आणि क्षमतांचा विचार करून पाहणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सद्यस्थितीत हा आजार मोठ्या प्रमाणात बळावत चालला असून मोबाईलचा अतिवापर हा सुद्धा या आजाराला कारणीभूत ठरत आहे. समाजातील अशा मुलांचा विचार करता प्रत्येक दहा मुलामागे एक मूल याप्रमाणे या आजाराचा रेशो आहे. या आजारामुळे मुलांच्या भाषा संवाद शिक्षण व समाजातील एकूणच प्रवास यावर मर्यादा येतात.
त्यामुळे पालकांना एक प्रकारे आपल्या मुलाविषयी काळजी वाढते. आपण शैक्षणिक क्षेत्रात 2016 मध्ये पाऊल टाकल्यानंतर शाळेत दाखल झालेल्या मुलांमधील काही बदल पाहता या आजाराबाबत आपल्याला जाणीव निर्माण झाली.
त्यामुळे अशा मुलांच्या बाबतीत योग्य उपचार पद्धत स्थानिक पातळीवर निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न केल. गोवा व पुणे आणि मोठ्या शहरातील हॉस्पिटलमध्ये या संदर्भात उपचार पद्धती म्हणजेच ऑक्युपेशनल थेरपी केली जाते त्या ठिकाणी जाण्याच्या खर्च आणि डॉक्टरांचा खर्च पाहता सर्वसामान्य पालकांसाठी हे आर्थिक बजेटच्या बाहेर होते.
त्यामुळे यावर छोटासा प्रयत्न म्हणून आपण कोलगाव येथील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल मध्येच ऑक्युपेशनल थेरेपी सेंटर सुरू करून त्या ठिकाणी अशा मुलांवर उपचार सुरू केले आहेत. सद्यस्थितीत या ठिकाणी डॉक्टर आकांक्षा आळवे या थेरेपिस्ट म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी गोवा मेडिकल कॉलेजमधून या संबंधित शिक्षण घेतले आहे. प्रत्येक मुलांना तब्बल पंचवीस मिनिटे ही थेरपी दिली जाते. यात मुलांच्या संवेदनशीलतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष व्यायाम आणि खेळांचा वापर केला जातो. यातून मुलांमध्ये निश्चितच फरक जाणवतो.
एका सामाजिक जाणीव इथून आपण हा प्रयत्न सुरू केला आहे. येथील पालकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल कडून एका मुलामागे पाचशे रुपये आणि पालकांकडून तीनशे रुपये आकारणी करून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सद्यस्थितीत शाळेतील मुलांसाठीच ही सुविधा उपलब्ध असली तरी येत्या दिवाळीपासून संपूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशा पालकांना मोफत उपचार पद्धतही देण्यात येणार आहे.
याशिवाय लवकरच यासंदर्भात पालकांमध्ये जनजागृती होण्यासाठी आपण मार्गदर्शन वर्गही सुरू करणार असल्याचे ते म्हणाले. निश्चितच संबंधित आजाराशी निगडित असलेल्या मुलांच्या अंगी असलेल्या उपजत कला ओळखून त्या कलेमध्ये त्यांना प्राविण्य देऊन त्यांना सक्षम करण्याचा माझा प्रयत्न राहील असे सांगितले.











