LIVE UPDATES

सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित 'कराओके' गायन स्पर्धा

सम्राट क्लब सावंतवाडी टाऊन आणि सैनिक स्कूल आंबोलीचे आयोजन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 06, 2026 16:57 PM
views 26  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : यंदाच्या नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून सम्राट क्लब सावंतवाडी टाऊन आणि सैनिक स्कूल आंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित कराओके गायन स्पर्धे’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी सावंतवाडी शहरातील माठेवाडा नवरात्रोत्सव मंडळाच्या श्री देव आत्मेश्वर मंदिर परिसर येथे पार पडणार आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त गायक कलाकारांनी या कराओके गायन स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन सम्राट क्लब सावंतवाडी टाऊनचे अध्यक्ष नरेंद्र देशपांडे, भावी अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सैनिक स्कूलचे प्रमुख व सैनिक पतसंस्थेचे सीईओ सुनील राऊळ आणि माठेवाडा नवरात्रोत्सव मंडळाचे नंदकिशोर गावडे यांनी केले आहे.

१८ ते ५० वयोगटातील तरुण-तरुणींसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत प्रथम क्रमांकास रोख ₹३,३३३, द्वितीय क्रमांकास रोख ₹२,२२२ आणि तृतीय क्रमांकास रोख ₹१,१११ सह स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविले जाणार आहे. याशिवाय दोन स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक, स्मृतिचिन्ह व सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपल्या गायनाची १ मिनिटाची ऑडिओ क्लिप सम्राट क्लब सावंतवाडी टाऊनच्या संचालिका श्रुती सावंत यांच्या +९१-८४१९९६०४७० या व्हॉट्सॲप क्रमांकावर ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत पाठवणे आवश्यक आहे. प्राप्त क्लिप्समधून निवडक २० उत्कृष्ट स्पर्धकांना मुख्य स्पर्धेत सादरीकरणाची संधी दिली जाईल.

या स्पर्धेचे परीक्षण ॲड. सिद्धी परब, सौ. स्मिता केंकरे आणि श्रुती सावंत करणार आहेत. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सैनिक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष बाबुराव कविटकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुप्रसाद चिटणीस करणार आहेत.

स्पर्धेच्या नियोजनासाठी सावंतवाडी येथे सम्राट क्लब सावंतवाडी टाऊनची बैठक पार पडली. या बैठकीला अध्यक्ष नरेंद्र देशपांडे, भावी अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, खजिनदार व सैनिक स्कूलचे प्रमुख सुनील राऊळ, कार्यक्रम नियोजन संचालिका ॲड. सिद्धी परब, संचालिका सौ. स्मिता केंकरे, डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, डॉ. सोनल लेले, मालवणी कवी दादा मडकईकर, कौस्तुभ पेडणेकर, श्रुती सावंत आणि गुरुप्रसाद चिटणीस आदी मान्यवर उपस्थित होते.