
दोडामार्ग : येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा दोडामार्ग नं. १ च्या आवारात मोकाट गुरांचा मुक्त वावर दिवसेंदिवस गहन होत चालला आहे. विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
शाळेच्या परिसरात गुरांचे शेण पडत असल्याने अस्वच्छता निर्माण होत असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वारंवार नगरपंचायत इतर प्रशासनाच्या निदर्शनास आणूनही संबंधित यंत्रणांकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने शाळा व्यवस्थापन समितीने आता आक्रमक भूमिका घेत शाळा बंद आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समितीने १२ ऑक्टोबर २०२६ रोजी संबंधित प्रशासनाला लेखी निवेदन सादर केले आहे. शाळेच्या आवारात मोकाट गुरांचा प्रवेश रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
शाळेच्या परिसरात गुरांचा वावर असल्याने विद्यार्थ्यांना दुर्गंधी, अस्वच्छता आणि संभाव्य अपघातांचा धोका सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असून, शाळेचे शैक्षणिक वातावरणही बाधित होत आहे. या समस्येकडे वारंवार लक्ष वेधूनही ठोस कार्यवाही होत नसल्याबद्दल समितीने नाराजी व्यक्त केली आहे.
आठ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलन...
संबंधित प्रशासनाने आठ दिवसांच्या आत शाळेच्या आवारात मोकाट गुरांचा प्रवेश रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीने केली आहे. या कालावधीत योग्य कार्यवाही न झाल्यास दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ पासून पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शाळा बंद आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांचे हित, आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षितता यांना प्राधान्य देऊन संबंधित यंत्रणांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालावे. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा पालकवर्गातून व्यक्त होत आहे.










