LIVE UPDATES

बाळासाहेबांचे विचार आधी वाचा

मंत्री नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 21, 2026 11:25 AM
views 24  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

सिंधुदुर्गनगरी : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार आणि उद्धव ठाकरे यांची सध्याची राजकीय भूमिका यावरून राज्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार उद्धव ठाकरे यांनी एकदा वाचावेत किंवा त्यांची भाषणे ऐकावीत, असा टोला लगावत राणे यांनी शिवाजी पार्कवरील भाषणावरून ठाकरे यांना लक्ष्य केले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हानही त्यांनी दिले.

 पालकमंत्री नितेश राणे हे पत्रकारांशी बोलत होते यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, मिलिंद मेस्त्री आदी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलताना नितेश राणे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरून हिंदुत्वाचा विचार बुलंद केला. हिंदू असण्याचा अभिमान व्यक्त करणाऱ्या घोषणा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवल्या. मात्र, त्याच शिवाजी पार्कवर उभे राहून उद्धव ठाकरे यांनी केलेली वक्तव्ये ही बाळासाहेबांच्या विचारांशी विसंगत असल्याचा आरोप राणे यांनी केला. बाळासाहेबांचे नाव आणि छायाचित्र वापरण्यापेक्षा त्यांच्या विचारांशी प्रामाणिक राहण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

राहुल गांधींच्या भूमिकेवरूनही सवाल

राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत राणे यांनी उद्धव ठाकरे यांना थेट प्रश्न विचारला. राहुल गांधी यांच्या भूमिकेशी सहमत आहात की असहमत, हे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगावे. केवळ भाषणांमध्ये बाळासाहेबांच्या विधानांचा वापर करून चालणार नाही, तर त्यांच्या हिंदुत्वाच्या विचारांशी बांधिलकीही दाखवावी, असे आव्हान त्यांनी दिले.

'रिजीम चेंज'च्या चर्चेवरून संजय राऊत यांच्यावरही राणे यांनी टीका केली. सरकार बदलण्याबाबत केली जाणारी वक्तव्ये म्हणजे सरकार बदलणे नव्हे, असे सांगत त्यांनी विरोधकांच्या राजकीय भाकितांची खिल्ली उडवली.

उद्धव ठाकरेंवर कायदा-सुव्यवस्थेवरून निशाणा

राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरूनही नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. सध्याच्या सरकारच्या काळात गुन्हेगारांविरोधात तातडीने कारवाई केली जात असल्याचा दावा त्यांनी केला. अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावरील हल्ल्याच्या प्रकरणात आंतरराज्य समन्वय साधून २४ तासांत आरोपींना पकडण्यात आल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या कारवाईचे समर्थन केले.

याउलट, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काही संवेदनशील प्रकरणांच्या तपासावरून प्रश्न उपस्थित झाले होते, असा आरोपही राणे यांनी केला. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी तत्कालीन सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी कायदा-सुव्यवस्थेवर भाष्य करण्यापूर्वी आपल्या कार्यकाळातील प्रकरणांची उत्तरे द्यावीत, असे ते म्हणाले.

संजय राऊत यांच्या भविष्यवाणीवरून टोला

मोदी सरकार एप्रिलमध्ये पडेल, अशा स्वरूपाच्या संजय राऊत यांच्या भाकितावरही राणे यांनी प्रतिक्रिया दिली. नरेंद्र मोदी हे देशातील नागरिकांच्या मनात आहेत आणि केंद्रातील सरकार पडण्याची शक्यता नसल्याचा दावा त्यांनी केला. राजकीय भविष्यवाणी करण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्याशी संबंधित राजकीय परिस्थितीची चिंता करावी, असा उपरोधिक टोला त्यांनी राऊत यांना लगावला.

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हिंदुत्व, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच देशविरोधी शक्तींबाबत घेतलेल्या भूमिकेवरून राणे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी वारशाचा उल्लेख करत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

पत्रकार परिषदेच्या अखेरीस, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या भूमिकेला महाराष्ट्रातील हिंदू समाजाने स्वीकारू नये, असे मत व्यक्त करत नितेश राणे यांनी विरोधकांवरील टीकेची धार कायम ठेवली.