
देवगड : देवगड तालुक्यात संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करा, बंधाऱ्यांची कामे दर्जेदार पद्धतीने राबवा आणि उपलब्ध जलसाठा वाढविण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करा, असे स्पष्ट निर्देश देवगड पंचायत समितीचे सभापती गणेश राणे यांनी दिले. पंचायत समितीच्या माध्यमातून १,५०० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यापैकी १,२१८ बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामेही लवकरच पूर्ण केली जाणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी निलेश जगताप यांनी दिली. दरम्यान, पंचायत समितीच्या मालकीच्या वापराविना पडलेल्या ११ जागांचा उपयोग करून उत्पन्न वाढविण्याचा निर्धारही राणे यांनी व्यक्त केला.
देवगड पंचायत समितीची मासिक सभा सभापती गणेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजी महाराज सभागृहात झाली. यावेळी उपसभापती अमोल लोके, गटविकास अधिकारी निलेश जगताप, पंचायत समिती सदस्य-सदस्या आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
देवगड तालुक्यात पाण्याची समस्या गंभीर बनत असताना केवळ विंधन विहिरींवर अवलंबून न राहता आवश्यक ठिकाणी विहिरींची संख्या वाढविणे, गाळ उपसा करणे आणि रोजगार हमी योजनेतून जलसंधारणाची कामे राबविण्याची सूचना सदस्य सादिक डोंगरकर यांनी केली. यावर गटविकास अधिकारी जगताप यांनी बंधाऱ्यांच्या कामांची माहिती दिली. जलतारा आणि शोषखड्ड्यांच्या कामांसाठी संबंधित विभाग, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि सरपंच यांना विश्वासात घेऊन नियोजन करावे. बंधाऱ्यांची कामे यंत्रांचा वापर न करता रोजगार सेवकांच्या माध्यमातून पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश देण्यात आले.
शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास तातडीने पंचनामे करावेत. कमी पावसामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असताना परस्परांचे मतभेद बाजूला ठेवून त्यांना दिलासा देणे आवश्यक आहे. इनाम जमिनींमुळे शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळण्यात येणाऱ्या अडचणी पालकमंत्र्यांसोबत चर्चा करून सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही सभापती राणे यांनी सांगितले. देवगड पंचायत समितीच्या मालकीच्या तालुक्यातील ११ जागा वापराविना पडून आहेत. यामध्ये धर्मशाळा, व्यापारी गाळे, निवासी संकुले आणि विश्रामगृहाचा समावेश आहे. देवगड शहरातील गोलतकर निवासस्थानासह तीन जागांची दुरुस्ती व सुशोभीकरण करून त्यांचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पंचायत समितीचे कार्यक्रम खासगी हॉल भाड्याने घेण्याऐवजी स्वतःच्या जागेत आयोजित केल्यास शासकीय खर्चाची बचत होईल आणि उत्पन्नातही वाढ होईल. यासाठी संबंधित विभागांनी कागदपत्रे पूर्ण करून प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवावेत, अशा सूचना राणे यांनी दिल्या.
एसटी, वीज वितरण आणि मच्छी वाहतुकीचे प्रश्न ऐरणीवर
गणेश चतुर्थीच्या काळात मुंबई-विरार येथील चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने पुरेशी व्यवस्था न केल्याने त्यांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागला. यामुळे झालेल्या आर्थिक भुर्दंडाबाबत राणे यांनी नाराजी व्यक्त केली. चालक-वाहकांनी प्रवाशांशी योग्य वर्तन ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.वीज वितरण विभागाने खांब उभारण्यासाठी खड्डे खोदूनही महिनाभर काम पूर्ण न केल्याने नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा सदस्य रवींद्र तिर्लोटकर यांनी उपस्थित झाला. प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. देवगड-नांदगाव, वाडा, पडेल, तिर्लोट आणि आंबेरी मार्गावर मच्छी वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून खराब पाणी रस्त्यावर पडत असल्याने अपघातांचा धोका निर्माण होत आहे. यावर ठोस कारवाई न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सदस्य अंकुश ठुकरुल यांनी दिला.
फार्मर आयडी, ग्रामपंचायत अपहारावरही चर्चा
फार्मर आयडी काढताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत सदस्य सदाशिव ओगले यांनी कृषी विभागाकडे ठोस उत्तरांची मागणी केली. शेतकऱ्यांची दिशाभूल न करता त्यांच्या समस्या सोडवाव्यात, असे त्यांनी सांगितले. नारिंग्रे ग्रामपंचायतीतील कथित अपहारानंतर राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्याची रोजगार सेवक म्हणून नियुक्ती कशी झाली, याचा खुलासा करण्याची मागणीही ओगले यांनी केली. कचरा संकलनासाठी खरेदी केलेल्या खराब झालेल्या सायकलींचा अहवाल सादर करण्याची सूचनाही त्यांनी केली.
दरम्यान, ग्रामीण भागातील भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. गोठ्यांसाठी दाखले देताना प्रत्यक्ष पाहणी करून खातरजमा करावी, असेही सभेत स्पष्ट करण्यात आले. पाणी वाचविणे, जलसाठा वाढविणे आणि शासकीय योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी जबाबदारीने काम करावे, असे आवाहन सभापती गणेश राणे यांनी केले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








