LIVE UPDATES

तिलारीच्या पाण्यावरून उपसभापती आक्रमक

वेळप्रसंगी उपोषणाला बसेन : गौरव जाधव ती बैठक कुणी रद्द केली : सभापती जाधव
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: July 16, 2026 16:04 PM
views 53  views

सावंतवाडी : तिलारीच पाणी मळगावसह इतर ६ गावांना का मिळत नाही ? जीवन प्राधिकरणाने हे काम करणं आवश्यक असताना जलजीवनला करण्यासाठी सांगितले गेले. मात्र, त्यांच्याकडे पैसेच नसून माझी अक्कल काढण्यापेक्षा ग्रामस्थांना पाणी कसं मिळेल, हे पाहण आवश्यक आहे. सभापतींनी यावर उत्तर द्याव, अशी मागणी उपसभापती गौरव मुळीक यांनी करत याप्रश्नी वेळप्रसंगी उपोषणाला बसेन असाही इशारा दिला. पं.स. मासिक सभेत त्यांनी हा मुद्दा मांडला. 

उपसभापती श्री. मुळीक म्हणाले, ग्रामीण पाणीपुरवठाकडून लोकांना पाणी मिळण आवश्यक आहे. आम्ही पैसे द्यायला तयार आहोत. ६ गावांना पाणी मिळाव यासाठी माझा प्रयत्न आहे‌. आरोस-दांडेली ते मळगावसाठीच अंदाजपत्रक तयार केलं आहे. पैसे जलजीवनमधून देणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, त्यांच्याकडे सध्या निधीच नाही आहे.‌ त्यामुळे मळगाव पर्यंतची लाईन जलजीवन मिशनमध्ये का घेता ? हा माझा प्रश्न आहे. आमसभेतही हा मुद्दा उपस्थित करणार असून टप्पा दोन सुरू असताना प्राधिकरणकडून आमच्या ६ गावांना पाणी पुरवठा होण आवश्यक आहे. पाणी घ्यायला आम्ही तयार आहोत. ही योजना तोट्यात असून लाईट बील देखील संबंधित विभाग भरू शकत नाही. त्यामुळे प्रसंगी पाण्यासाठी  उपोषण करावे लागले तर ते देखील करेन, रेल्वे टर्मिनसला देखील हे पाणी मिळणार आहे. या पाण्यामुळे टर्मिनसचा प्रश्नही सुटेल असं मत श्री. मुळीक यांनी व्यक्त केले. 

यावेळी जलजीवनकडे पैसेच नाहीत, त्यांची काम रखडलेली आहेत. नवीन योजनेला पैसे कुठून देणार ? असा सवाल सदस्य जितेंद्र गांवकर यांनी केला. तसेच मायकल डिसोजा, उदय पारिपत्ये, शरद धाऊसकर, धनश्री मराठे आदींनीही ग्रामीण पाणीपुरवठा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना याबाबत सवाल केला. जलजीवनची रखडलेली काम कधी पुर्णत्वास येणार असे सवाल केले‌.

यावेळी सभापती सुस्मिता जाधव यांनी सविस्तर माहिती घेऊन पुढील बैठकीत याचे उत्तर दिले जाईल. तसेच जलजीवनसाठी पालकमंत्र्यांनी बैठक घेतली आहे. संबंधित विभागाचे वरिष्ठ आता उपस्थित नाहीत‌. जलजीवनची बैठक पुढे कुणी ढकलली ? हे देखील मला सांगाव, संबंधित अधिकारी बाहेरच्या बाहेर निघून गेले. त्यांना कुणी बाहेर काढलं ? असे सवालही त्यांनी करत या विभागाची बैठक लावण्यासाठी सुचना दिल्या. यावेळी संबंधित गावांच्या सरपंचाना देखील आमंत्रित करा अशी मागणी उदय पारिपत्ये यांनी केली.