LIVE UPDATES

सिंधुदुर्गातील सर्व न्यायालयात 12 सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालत

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 08, 2026 18:35 PM
views 57  views

सिंधुदुर्गनगरी :  न्यायप्रक्रियेला गती देऊन सर्वसामान्य नागरिकांना जलद व सुलभ न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार शनिवार, दि. 12 सप्टेंबर 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही या वर्षातील तिसरी राष्ट्रीय लोकअदालत असून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.

या लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, कौटुंबिक व वैवाहिक वाद, मोटार अपघात दावा प्रकरणे, भूसंपादन व महसुली प्रकरणे, धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणे तसेच वीज बिल, पाणीपट्टी देयके आदी तडजोडीस पात्र प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत. तसेच बँका, वित्तीय संस्था व विमा कंपन्यांशी संबंधित तडजोडीस पात्र प्रकरणे आणि दाखलपूर्व वादांचाही समावेश करण्यात येणार आहे.

लोकअदालतीच्या माध्यमातून वाद परस्पर संमतीने व सामोपचाराने सोडविले जात असल्याने पक्षकारांचा वेळ, पैसा व मानसिक त्रास वाचण्यास मदत होते. लोकअदालतीमध्ये झालेला निवाडा अंतिम व दोन्ही पक्षकारांवर बंधनकारक असतो. तसेच प्रकरण निकाली निघाल्यास नियमानुसार भरलेले न्यायालयीन शुल्क परत मिळण्याची तरतूद आहे.तडजोडीस पात्र प्रलंबित प्रकरणांसाठी संबंधित न्यायालयात अर्ज सादर करता येईल. तसेच दाखलपूर्व वादांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा संबंधित तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधता येईल.

तरी नागरिक, शासकीय विभाग, बँका, वित्तीय संस्था, विमा कंपन्या तसेच संबंधित पक्षकारांनी आपल्या तडजोडीस पात्र प्रकरणांचा आढावा घेऊन राष्ट्रीय लोकअदालतीचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. व्ही. नडगदल्ली यांनी केले आहे.