LIVE UPDATES

राष्ट्रीय महामार्ग खड्डेमय; चालकांना मनस्ताप

तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील नाधवडे येथील प्रकार; महिनाभरापूर्वी केलेले काम पुन्हा खड्ड्यात
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 11, 2026 15:17 PM
views 26  views
#kokansadlive#news update#konkan update#

वैभववाडी : तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील नाधवडे येथे रस्त्याची दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे दोन महिन्यापूर्वीच या ठिकाणी रस्ता नुतनीकरणाचे काम करण्यात आले होते. मात्र, अवघ्या काही दिवसांतच हे काम उखडून पुन्हा रस्ता खड्डेमय झाल्याने संबंधित कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 नाधवडे परिसरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांसह चारचाकी व अवजड वाहनचालकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

  दरम्यान या रस्त्याच्या दुरवस्थेचा मुद्दा वैभववाडी पंचायत समितीच्या मागील दोन सभांमध्ये उपस्थित करण्यात आला होता. सभापती तसेच सदस्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त करून तातडीने खड्डे बुजविण्याची मागणी केली होती. मात्र, वारंवार मागणी करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही.

दोन महिन्यापूर्वी या रस्त्याचे नुतनीकरण  करण्यात आले होते. मात्र, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हे काम अल्पावधीतच उखडल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे सार्वजनिक पैशांचा खर्च करूनही रस्त्याची समस्या कायम राहिल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

  राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच वाहतुकीचा वेगही मंदावत आहे. गणेश उत्सव काळात येथील परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असून, संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून दर्जेदार पद्धतीने खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे.