
देवगड : सामाजिक, सांस्कृतिक आणि समाजसेवेच्या क्षेत्रात गेल्या तीन दशकांहून अधिक काळ सातत्याने योगदान देत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणारे कोकण कट्टा संस्थापक श्री. अजितदादा पितळे यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना ‘नवरत्न पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.
अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषद यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सन्मान सोहळ्यात समाजसेवा, सांस्कृतिक जतन आणि विविध सामाजिक उपक्रमांमधील अजितदादा पितळे यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्याचा हा सन्मान म्हणजे समाजाप्रती त्यांनी गेली तीन दशके केलेल्या समर्पित आणि सातत्यपूर्ण कार्याची पोचपावती असल्याचे उपस्थित मान्यवरांनी यावेळी सांगितले.
समाजश्रेष्ठी, नामवंत डॉक्टर व सन्माननीय गजानन रत्नपारखी यांच्या शुभहस्ते अजितदादा पितळे यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी सुरेंद्रभाऊ शंकरशेट, दिनकर बायकेरीकर, अॅड. मनमोहन चोणकर, साहित्यिक रवींद्र माहिमकर, सुवर्णमूर्तिकार नाना वेदक, सूर्यकांत कल्याणकर, विजय पितळे, सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
समाजसेवेची तीन दशकांची वाटचाल
अजितदादा पितळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी, सांस्कृतिक आणि जनहिताचे उपक्रम सातत्याने राबविले आहेत. ‘कोकण कट्टा’ या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणत सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय ठरले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेने त्यांचा ‘नवरत्न पुरस्कार २०२६’ देऊन सन्मान केला.
‘हा सन्मान माझ्या सहकाऱ्यांचा’ — अजितदादा पितळे
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना अजितदादा पितळे यांनी या सन्मानाबद्दल अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले. हा पुरस्कार केवळ आपला वैयक्तिक सन्मान नसून ‘कोकण कट्टा’च्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या योगदानाचा तसेच आपल्या कार्यात प्रेमळ सान्निध्य देणाऱ्या सर्व व्यक्तींचा सन्मान आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या सोहळ्यावेळी त्यांच्या पत्नी सौ. आकांक्षा अजित पितळे तसेच कोकण कट्टाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सन्मान सोहळ्याला शेकडो समाजबांधवांची उपस्थिती लाभली. त्यामुळे संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण आणि भावनिक झाले होते. अजितदादा पितळे यांच्या कार्याचा गौरव होत असताना उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
जोगेश्वरी मुंबई येथील कोकण कट्टा या संस्थेचे स्वामी भक्त अजित पितळे यांच्या सामाजिक कार्याची निष्ठा, समाजाशी असलेली बांधिलकी आणि सातत्यपूर्ण सेवाभावाची दखल घेत मिळालेला ‘नवरत्न पुरस्कार २०२६’ हा अजितदादा पितळे यांच्या तीन दशकांच्या समाजसेवी वाटचालीतील मानाचा तुरा ठरला आहे. या पुरस्कारामुळे त्यांची जबाबदारी आता वाढलीय.अजित पितळे व कोकणकट्टाच्या सर्व सहकाऱ्यांचे वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोटचे चेअरमन महेश इंगळे यांनी मनापासून अभिनंदन करत यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.










