LIVE UPDATES

मुंबई ते सिंधुदुर्ग विमान प्रवास आता ३ हजार ५८० रुपयांत

खास. नारायण राणे, मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 06, 2026 00:22 AM
views 42  views

सिंधुदुर्ग : कोकण किनारपट्टीला थेट मुंबईच्या व्यापारी केंद्राशी जोडण्यासाठी आणि पर्यटनाला नवा वेग देण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण व दिलासादायक निर्णय घेतला आहे. नव्याने आकाराला येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सिंधुदुर्गातील चिपी विमानतळादरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली असून, या मार्गावरील विमान प्रवास आता अवघ्या ३ हजार ५८० रुपयांच्या आत उपलब्ध होणार आहे.खासदार नारायण राणे,पालकमंत्री नितेश राणे यांच्या राज्य व केंद्र सरकार कडे केलेल्या सातत्य पूर्ण प्रयत्नांना यश आले आहे.लवकरच ही विमान सेवा सुरू होणार आहे.


मुंबई ते सिंधुदुर्ग हा तासन-तासांचा रस्ते किंवा रेल्वे प्रवास आता काही मिनिटांवर येणार आहे. चाकरमानी, पर्यटक आणि स्थानिक व्यावसायिकांचा वेळ वाचावा तसेच कोकणातील निसर्गरम्य पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने प्रशासनाने ही सवलतीची विमानसेवा आखली आहे. केंद्र सरकारच्या लोकप्रिय 'उडान' योजनेअंतर्गत हा मार्ग विकसित केला जात आहे. प्रवाशांना परवडणाऱ्या दरात तिकीट उपलब्ध व्हावे आणि विमान कंपन्यांचाही तोटा होऊ नये, यासाठी राज्य शासन १०० टक्के व्यवहार्यता तफावत निधी देणार आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने या मार्गावर विमानसेवा सुरू करण्यासाठी नामांकित विमान कंपन्यांकडून ई-निविदा व व्यावसायिक प्रस्ताव मागवले आहेत.


नवी मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास: रु. ३,५८० तर सिंधुदुर्ग ते नवी मुंबई (परतीचा प्रवास): रु. ३,७३५ असा राहणार आहे.विमान कंपन्यांवर कडक अटी व शर्ती विमानसेवेचे नियमन व्यवस्थित राहावे यासाठी प्रशासनाने काही कडक अटी निश्चित केल्या आहेत. सेवा देणाऱ्या विमान कंपन्यांना सलग दोन महिने किमान ७५ टक्के प्रवासी उपस्थिती राखणे बंधनकारक असणार आहे. याशिवाय, कोणत्याही तांत्रिक कारणाशिवाय किंवा विनाकारण विमान जमिनीवर थांबवून ठेवल्यास कंपनीला प्रतिदिन १ लाख रुपयांचा दंड ठोठावला जाईल. चिपी विमानतळावर मोठ्या विमानांच्या (एअरबस A321) लँडिंगसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व तांत्रिक सोयी-सुविधा आधीच सज्ज आहेत. त्यामुळे ही विमानसेवा सुरू होताच अवघ्या तासाभरात मुंबईकर थेट सिंधुदुर्गात दाखल होऊ शकतील, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे.