
कुडाळ : कुडाळ शहरातील खालची कुंभारवाडी येथील ५५ वर्षीय महिला घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्याने ती बेपत्ता झाली आहे. उर्मिला उमेश कुंभार (वय ५५, रा. खालची कुंभारवाडी, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) असे बेपत्ता महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यामार्फत महिलेचा शोध घेण्यात येत असून, तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उर्मिला कुंभार या २३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास घरातील कोणालाही काहीही न सांगता घरातून बाहेर पडल्या. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांच्या नातेवाईक तसेच परिचितांकडे चौकशी करून शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही.
बेपत्ता महिलेने निळसर रंगाचा किंवा अन्य कोणत्याही रंगाचा गाऊन परिधान केलेला असण्याची शक्यता आहे. त्यांच्या गळ्यात काळ्या रंगाचा दोरा असून, त्याला काळ्या छोट्या मण्यांचे खोटे मंगळसूत्र आहे. या वर्णनावरून महिला कोणास आढळल्यास तिची ओळख पटविण्यास मदत होऊ शकते.
कुडाळ पोलीस ठाण्यामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, सदर महिला कोणासही दिसून आल्यास तिला सुरक्षित ठिकाणी थांबवून ठेवावे आणि विलंब न करता कुडाळ पोलीस ठाण्याला संपर्क करावा अशी माहिती देण्यात आली आहे.
महिलेच्या शोधासाठी नागरिकांनी ही माहिती आपल्या परिचितांपर्यंत तसेच सोशल मीडिया माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. नागरिकांच्या छोट्याशा माहितीतून बेपत्ता महिलेचा ठावठिकाणा मिळून त्यांची कुटुंबीयांशी सुखरूप भेट होण्यास मदत होऊ शकते.










