LIVE UPDATES

झाडांना राखी बांधून विद्यार्थ्यांनी दिला ‘निसर्ग आपला रक्षक’ चा संदेश

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 28, 2026 19:13 PM
views 14  views

देवगड : श्रीमती नलिनी शांताराम पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘निसर्ग आपला रक्षक’ या संकल्पनेवर आधारित अभिनव पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी महाविद्यालय परिसरातील झाडांना राखी बांधून वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून झाडे आणि निसर्ग हे मानवी जीवनाचे खरे रक्षक आहेत, ही भावना विद्यार्थ्यांनी कृतीतून व्यक्त केली. झाडे आपल्याला प्राणवायू देण्याबरोबरच तापमान नियंत्रण, मृदा व जलसंवर्धन आणि जैवविविधता टिकविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे वृक्षांचे संरक्षण व संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना निसर्गसंवर्धनाचे महत्त्व स्पष्ट केले. “निसर्गाचा समतोल राखणे ही आजच्या काळाची गरज असून, पर्यावरण संरक्षणाची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करावी,” असे त्यांनी सांगितले.

उपप्राचार्य डॉ. पारस जाधव यांनी झाडे आपली रक्षक कशी आहेत, हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्पष्ट केले. प्रकाशसंश्लेषण, कार्बन डायऑक्साइडचे शोषण, प्राणवायूची निर्मिती, तापमान नियंत्रण, जलचक्र आणि मृदा संवर्धन यांसारख्या प्रक्रियांमध्ये वृक्षांचे असलेले महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी झाडांना राखी बांधून त्यांचे संरक्षण व संगोपन करण्याचा संकल्प केला.

कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. मनोहर तेली, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. स्नेहल जोईल आणि प्रा. प्रभाकर वाघ यांनी केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दलची संवेदनशीलता आणि वृक्षसंवर्धनाची जाणीव निर्माण झाली.