
कुडाळ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करून वैयक्तिक टीका केल्याचा आरोप करत संबंधितांवर तात्काळ योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ पोलिसांकडे केली आहे.
यासंदर्भातील निवेदन २८ ऑगस्ट २०२६ रोजी कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास बडवे यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्याबद्दल शिंदे गटाचे काही कार्यकर्ते सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्वरूपाच्या पोस्ट करत आहेत. संबंधित पोस्टमध्ये वैयक्तिक स्वरूपाची टीका करण्यात येत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली असून, सोशल मीडिया हे मत व्यक्त करण्याचे माध्यम असले तरी एखाद्या व्यक्तीविरुद्ध खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक टीका करणे योग्य नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात स्वरूप वाळके, प्रसन्ना गंगावणे, विश्वास पांगुळ, सागर वालावलकर यांच्याकडून वैभव नाईक यांच्याबाबत आक्षेपार्ह व वैयक्तिक स्वरूपाच्या पोस्ट केल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पोस्टची चौकशी करून संबंधितांवर तात्काळ योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय आरोप-प्रत्यारोपांची तीव्रता वाढत असताना त्यामध्ये वैयक्तिक टीका किंवा आक्षेपार्ह मजकूर वापरला जाऊ नये, अशी भूमिका निवेदन देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन सोशल मीडिया पोस्टची सत्यता, त्यामागील व्यक्ती तसेच पोस्टचा आशय याची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन देताना अतुल बंगे, मंदार शिरसाट, धिरेंद्र चव्हाण, बाळा पावसकर, अमित राणे, संदीप महाडेश्वर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिसांकडून या निवेदनाची दखल घेऊन संबंधित सोशल मीडिया पोस्टची पडताळणी व चौकशी केल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










