
कणकवली : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाकडून मोठ्या प्रमाणात अतिरिक्त बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, त्याचा परिणाम स्थानिक नियमित बससेवेवर होत असून कणकवली बसस्थानकातील ३० पेक्षा अधिक एसटीच्या नियमित फेऱ्या रद्द करण्यात आल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
गणेशोत्सवासाठी मुंबई परिसरातून कोकणात मोठ्या प्रमाणात प्रवासी येत असल्याने एसटी महामंडळाने विशेष बससेवा सुरू केली आहे. कणकवली स्थानकातूनही मुंबईच्या दिशेने २० पेक्षा जास्त एसटी बसेस रवाना झाल्याने स्थानिक मार्गावरील बसफेऱ्यांवर परिणाम झाला आहे. राज्यातील विविध आगारांतून कोकणासाठी मोठ्या प्रमाणात बसेस उपलब्ध करून देण्यात आल्याचे वृत्त आहे.
मात्र, ग्रामीण भागातील नियमित प्रवाशांना याचा मोठा फटका बसत आहे. बसफेऱ्या रद्द झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी बस उपलब्ध होत नसल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. अनेक प्रवाशांना पुढील बसची प्रतीक्षा करावी लागत असून काहींना पर्यायी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
गणेशोत्सवासाठी अतिरिक्त बससेवा देताना ग्रामीण भागातील नियमित प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याचीही एसटी प्रशासनाने दक्षता घ्यावी. रद्द झालेल्या नियमित फेऱ्या शक्य तितक्या लवकर पूर्ववत कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.










