
राजापूर : तालुक्यातील मूर-तांबळवाडी येथील ग्रामस्थांनी सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत पतीच्या निधनानंतर महिलांवर लादल्या जाणाऱ्या पारंपरिक विधवा प्रथेचे पालन यापुढे न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पतीच्या निधनानंतर महिलेचे अलंकार उतरवणे, कुंकू पुसणे आदी प्रथा बंद करण्याचा ठराव ग्रामस्थांच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.
पतीच्या निधनाचे दुःख सहन करत असतानाच संबंधित महिलेच्या सौभाग्याच्या खुणा काढून घेण्याची प्रथा अनेक ठिकाणी पूर्वापार चालत आली आहे. मात्र, अशा प्रथांमुळे दुःखाच्या काळात महिलेला अतिरिक्त मानसिक वेदना सहन कराव्या लागतात. बदलत्या सामाजिक परिस्थितीचा विचार करून आणि स्त्रीच्या सन्मानाला प्राधान्य देत ही प्रथा कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय मूर-तांबळवाडी ग्रामस्थांनी घेतला.
मुंबई मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बारगोडे, प्रकाश यद्रुक, सचिव विलास पवार, तसेच विजय बने, राजेश बने, विजय पवार, रघुनाथ गुंडये यांच्यासह मुंबई मंडळाचे पदाधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आला.
यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की, काळानुसार समाजातील प्रथा आणि रूढींमध्ये आवश्यक ते बदल होणे गरजेचे आहे. ज्या प्रथांमुळे महिलांना अनावश्यक मानसिक त्रास किंवा वेदना सहन कराव्या लागतात, त्या प्रथा सामूहिक पुढाकारातून बंद करण्याची गरज आहे. महिलांच्या सन्मानाचे रक्षण करणे ही संपूर्ण समाजाची जबाबदारी असून, अशा निर्णयांमुळे स्त्री सन्मान आणि सक्षमीकरणाला बळ मिळेल, अशी भूमिका ग्रामस्थांनी व्यक्त केली.
मूर-तांबळवाडी ग्रामस्थांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सामाजिक सुधारणेच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल पडले असून, परिसरात या निर्णयाचे स्वागत होत आहे. गावागावांतही अशा सामाजिक परिवर्तनाला चालना मिळावी, अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे.










