
देवगड : संभाव्य चक्रीवादळ, अतिवृष्टी, समुद्राला उधाण आणि समुद्राच्या पाणीपातळीत वाढ होऊन निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी प्रशासनाची सज्जता तपासण्याच्या उद्देशाने गुरुवारी (दि. १ ऑक्टोबर) विजयदुर्ग व तांबळडेग समुद्रकिनारी आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम घेण्यात आली. या मॉक ड्रिलमध्ये एनडीआरएफसह पोलीस, महसूल, आरोग्य विभाग, पंचायत समिती, ग्रामपंचायत, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर देवगड नायब तहसीलदार खरात, पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले, देवगड पंचायत समितीचे सभापती गणेश राणे, उपसभापती अमोल लोके,गटविकास अधिकारी निलेश जगताप,जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, महसूल व आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी, पोलीस दल, एनडीआरएफ पथक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याचे गृहीत धरून या सरावाचे आयोजन करण्यात आले. आपत्तीची पूर्वसूचना मिळाल्यानंतर धोकादायक भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविणे, घटनास्थळी बचाव पथक पोहोचविणे, अडकलेल्या नागरिकांची सुटका करणे, जखमींना प्राथमिक उपचार देणे आणि आवश्यकतेनुसार त्यांना रुग्णालयात हलविणे, याचा प्रत्यक्ष सराव करण्यात आला.
एनडीआरएफ पथकाने आपत्तीच्या परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासह बचावकार्याची प्रात्यक्षिके केली. त्याचबरोबर विविध शासकीय यंत्रणांमध्ये तातडीने संपर्क व समन्वय कसा साधावा, उपलब्ध मनुष्यबळ आणि साधनसामग्रीचा प्रभावी वापर कसा करावा, याचीही उजळणी करण्यात आली. आरोग्य विभागाच्या पथकाने जखमींना तातडीने वैद्यकीय मदत देण्याची तयारी तपासली.
विजयदुर्ग व तांबळडेग हे किनारपट्टीवरील महत्त्वाचे भाग असल्याने संभाव्य चक्रीवादळ व नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर या रंगीत तालमीला विशेष महत्त्व होते. या सरावामुळे आपत्तीच्या वेळी विविध यंत्रणांनी एकत्रितपणे काम करण्याची कार्यपद्धती स्पष्ट झाली असून, प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणी ओळखून त्यावर पूर्वतयारी करण्यासही मदत होणार आहे. नागरिकांनी आपत्तीच्या काळात घाबरून न जाता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.










