
देवगड : महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे भेट देऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने चेअरमन तथा नगरसेवक (मालक) महेश इंगळे यांनी केसरकर यांचा श्रीफळ, स्वामींचे कृपावस्त्र आणि स्वामी समर्थांची प्रतिमा देऊन सत्कार केला.
दर्शनानंतर बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, "श्री वटवृक्ष मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून येथे येणाऱ्या प्रत्येकाला मानसिक शांतता, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. त्यामुळे हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नसून श्रद्धा, सेवा आणि अध्यात्माचे प्रेरणास्थान आहे."
यानंतर त्यांनी मंदिर परिसराची पाहणी करत देवस्थानच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध धार्मिक, सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांची माहिती घेतली. मंदिर परिसरातील व्यवस्थापन आणि भाविकांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधांचेही त्यांनी कौतुक केले.
यावेळी उपनगराध्यक्ष बंटी राठोड, नगरसेवक ननू कोरबू, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटोळे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, सचिन पवार, विपुल जाधव, भैय्या गायकवाड, श्रीकांत मळवे यांच्यासह स्वामी समर्थ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.













