LIVE UPDATES

देवगड न.पं.च्या सुधारित आकृतिबंधास मंजुरी द्यावी

मंत्री नितेश राणेंची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पत्राद्वारे मागणी
Edited by: स्वप्नील लोके
Published on: May 19, 2026 20:05 PM
views 38  views

देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायतीचा सुधारित आकृतिबंध मंजूर करून तत्कालीन ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यासाठी आवश्यक अधिसंख्य पदनिर्मितीस मान्यता द्यावी, अशी मागणी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

पत्रात नमूद केल्यानुसार, देवगड-जामसंडे नगरपंचायतीचा आकृतिबंध शासनाने २२ सप्टेंबर २०२७ रोजी मंजूर केला होता. त्यावेळी १० हजार ते १५ हजार लोकसंख्या विचारात घेण्यात आली होती. मात्र, नगरपंचायतीचे कार्यक्षेत्र ३२.५ चौ.कि.मी. इतके विस्तृत असून वाढते शहरीकरण, पर्यटनवाढ आणि नागरिक सुविधांवरील वाढता ताण लक्षात घेता सध्याचा आकृतिबंध अपुरा पडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

देवगड-जामसंडे ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर तत्कालीन ग्रामपंचायतीमधील वर्ग-३ व वर्ग-४ मधील २८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या कर्मचाऱ्यांच्या समावेशनाबाबत शासनस्तरावर धोरण निश्चित नसल्याने त्यांच्या वेतनाचा आर्थिक भार नगरपंचायतीवर पडत असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

पूर्वीच्या ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा नगरपंचायतीच्या प्रशासकीय संरचनेत समावेश करणे आवश्यक असून त्यांच्या अनुभवाचा स्थानिक प्रशासनाला फायदा होणार असल्याचे राणे यांनी म्हटले आहे. यासाठी आवश्यक अधिसंख्य पदनिर्मिती व सुधारित आकृतिबंधास मंजुरी देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मुख्याधिकारी, देवगड-जामसंडे नगरपंचायती यांनी याबाबतचा सविस्तर प्रस्ताव आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद संचालनालय यांच्याकडे सादर केल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.