LIVE UPDATES

मंत्री नितेश राणेंनी जहाजबांधणी, दुरुस्ती, जलमार्ग व बंदर विकासाचा घेतला आढावा

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: September 10, 2026 21:21 PM
views 32  views

पणजी : महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील गोवा शिपयार्ड लिमिटेडला (GSL) भेट देत जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती, जलमार्ग सुविधा तसेच बंदर व जेटी विकासाचा सविस्तर अभ्यास केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जहाजबांधणी उद्योगाची सुरुवात होत असतानाच हा दौरा महत्वपूर्ण ठरत आहे. यातून गोवा शिपयार्डचा व सिंधुदुर्गात जहाजबांधणीला मार्गदर्शनाची जोड ठरणार आहे.

गोवा शिपयार्ड लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश कुमार उपाध्याय आणि कार्यकारी संचालक नागेश पै यांनी मंत्री नितेश राणे यांचे स्वागत केले. 

यावेळी शिपयार्डमधील जहाजबांधणी व दुरुस्तीच्या विविध सुविधांची माहिती देण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात छोट्या जहाजबांधणी उद्योगाची सुरुवात होत असतानाच झालेल्या या अभ्यास दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

महाराष्ट्राला लाभलेली सुमारे ६७७ किलोमीटरची समुद्रकिनारपट्टी ही केवळ पर्यटनासाठी नव्हे, तर जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती, प्रवासी जलवाहतूक, मत्स्य व्यवसाय आणि समुद्राधारित उद्योगांच्या विकासासाठी मोठी संधी आहे. या क्षमतेचा प्रभावी वापर झाल्यास संपूर्ण कोकण किनारपट्टी रोजगार आणि औद्योगिक विकासाचे नवे केंद्र बनू शकते, असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी या दौऱ्यानंतर व्यक्त केला.

आधुनिक प्रणालीद्वारे ६ हजार टनांपर्यंतच्या जहाजांवर काम करण्याची क्षमता, बांधकाम व दुरुस्ती बर्थ, २५० मीटर जेट्टी, स्टील व अॅल्युमिनियम फॅब्रिकेशन सुविधा आणि अत्याधुनिक CAD/CAM तंत्रज्ञान यामुळे गोवा शिपयार्ड हे महाराष्ट्राच्या, विशेषतः सिंधुदुर्गाच्या जहाजबांधणी विकासासाठी अभ्यासाचे महत्त्वाचे केंद्र ठरते.

सिंधुदुर्गातील खाड्या, समुद्रकिनारे आणि जलमार्गांचा योग्य वापर करून छोटी जहाजे व बोटींची निर्मिती, जहाज दुरुस्ती केंद्रे, पर्यटन बोटी, प्रवासी जलवाहतूक आणि त्यांना पूरक ancillary industries उभ्या राहिल्यास स्थानिक तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊ शकते. त्यामुळे गोवा शिपयार्डचा अनुभव सिंधुदुर्गाच्या समुद्राधारित अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारा ठरू शकतो.

गोवा शिपयार्डचा अनुभव सिंधुदुर्गात छोट्या जहाज व बोटबांधणी उद्योगासाठी मार्गदर्शक ठरू शकतो. जहाजबांधणीसोबतच जहाज दुरुस्ती, refit, स्टील-अॅल्युमिनियम फॅब्रिकेशन, पर्यटन बोटी, प्रवासी जलवाहतूक आणि ancillary industries विकसित करण्याची मोठी क्षमता जिल्ह्यात आहे. यामुळे केवळ बोटबांधणीपुरता उद्योग मर्यादित न राहता समुद्राशी संबंधित संपूर्ण औद्योगिक परिसंस्था उभी राहू शकते.

स्थानिक कौशल्यविकास, तंत्रज्ञान, आधुनिक सुविधा आणि प्रशिक्षित मनुष्यबळ यावर भर दिल्यास सिंधुदुर्गात जहाजबांधणी उद्योगासोबत मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात.

यावेळी उद्योजक डॉ. निलेश बाणावलीकर, सूरज देव्हाद्या, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, मिलिंद मेस्त्री, संदीप साटम, रुपेश कानडे, डॉक्टर अमोल तेली आधी सिंधुदुर्गातील लोकप्रतिनिधी या दौऱ्यात सहभागी झाले होते.