
कणकवली : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी कणकवली शहरामध्ये पोलिसांकडून ‘मिशन ऑल आऊट’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांच्या सूचनेनुसार कणकवली पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत आहे.
गंगोमंदिर नाका येथे पोलिसांकडून नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. यावेळी अवैध पार्किंग, वाहन चालविताना मोबाईलवर संभाषण, वाहन परवाना नसणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे तसेच ट्रिपल सीट वाहन चालविणे अशा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
तसेच कणकवली शहरातील मुख्य पटवर्धन चौकातही अवैध पार्किंगविरोधात पोलिसांकडून धडक कारवाई करत आज दिवसभरात तब्बल 15 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. गणेश चतुर्थीनिमित्त मोठ्या संख्येने गणेशभक्त शहरात दाखल होत असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. ही मोहीम सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
गणेशोत्सव काळात वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नानसे, पोलीस हेडकॉन्स्टेबल दिलीप पाटील, वाहतूक पोलीस आशिष जाधव, महिला पोलीस अपर्णा होवाळे तसेच पोलीस कॉन्स्टेबल दळवी सहभागी झाले आहेत.










