LIVE UPDATES

शेतकरी हित जपणे हे जिल्हा बँकेचे दायित्व : मनीष दळवी

१०० टक्के वसुली करणाऱ्या वैभववाडी तालुक्यातील २२ विकास संस्थांचा सत्कार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 29, 2026 19:27 PM
views 24  views

वैभववाडी : गेल्या साडेचार वर्षांत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा बँकेने अनेक सकारात्मक निर्णय घेतले. या निर्णयांची अंमलबजावणी करताना बँकेला आपल्या नफ्यातूनही निधी खर्च करावा लागला आहे. शेतकऱ्यांच्या पाठबळामुळेच जिल्हा बँक सक्षमपणे उभी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित जपणे हे बँकेचे कर्तव्य आणि दायित्व आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले.

 वैभववाडी तालुक्यात १०० टक्के कर्जवसुली करणाऱ्या २२ विकास सहकारी संस्थांचा सत्कार सोहळा पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी दळवी बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, संचालक गजानन गावडे, रवींद्र मडगावकर, दिलीप रावराणे, दिगंबर पाटील, सीमा नानीवडेकर, दत्ताराम गावडे, संगणक प्रमुख हडकर, प्रल्हाद कुडतरकर, सुरेश रावराणे आदी उपस्थित होते.

श्री.दळवी म्हणाले, सहकार व्यवस्थेतील त्रिसूत्रीची पहिली पायरी ही विकास सहकारी संस्था आहे. या संस्था सक्षम करण्यासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि जिल्हा बँकेकडून गेल्या दोन वर्षांपासून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. संस्थांचा कारभार अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून विकास संस्थांच्या व्यवहारांचे संगणकीकरण करण्यात आले आहे.

यापुढे संस्थेतील प्रत्येक व्यवहाराची नोंद संगणकीकृत पद्धतीने केली जाणार आहे. त्यामुळे व्यवहारांमध्ये पारदर्शकता येऊन सभासदांचा संस्थांवरील विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा बँकेकडून सध्या ज्या प्रकारची कर्जे दिली जातात, ती सर्व कर्जे भविष्यात विकास सहकारी संस्थांमार्फत उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा बँकेच्या तुलनेत एक टक्का कमी व्याजदराचा लाभ सभासदांना देण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये केवळ शेती कर्जाचा समावेश नसून अन्य प्रकारची कर्जेही संस्थांमार्फत दिली जाणार आहेत.

पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अवघ्या ४८ तासांत उपलब्ध करून देण्यासाठी प्रणाली विकसित केली जात असल्याचेही दळवी यांनी सांगितले. विकास संस्थांनी पारंपरिक व्यवसायापुरते मर्यादित न राहता आपल्या व्यवसायाच्या कक्षा विस्तारण्याची गरज आहे. जिल्हा बँकेने साडेचार वर्षांत चार हजार १०० कोटी रुपयांची उलाढाल साडेसात हजार कोटी रुपयांपर्यंत नेली आहे. त्याच धर्तीवर विकास संस्थांचीही उलाढाल वाढली पाहिजे. संस्थांनी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

संस्थांच्या सचिवांना चांगले वेतन मिळावे यासाठीही बँकेकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी बँकेच्या नफ्यातून निधी उपलब्ध करून दिला जात आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या काही निर्णयांचा बँकेच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो; मात्र ही बँक भूमिपुत्र शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे त्यांच्या हितासाठी काहीतरी करणे हे बँकेचे दायित्व आहे, असे दळवी यांनी स्पष्ट केले.

यावेळी गजानन गावडे, रवींद्र मडगावकर, दिगंबर पाटील, सीमा नानीवडेकर आणि अनिरुद्ध देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. दिलीप रावराणे यांनी आभार मानले.