
दोडामार्ग : धाटवाडी येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या वीजवापराबाबत उपस्थित करण्यात आलेल्या तक्रारीची महावितरणकडून तपासणी करण्यात आली. या तपासणीत प्रसाद रघुनाथ पांगम यांच्या नावाशी संबंधित प्रकरणात महावितरणच्या थीफ्ट युनिटने १,१४४ युनिट वीजवापर निश्चित केला असून, त्यानुसार १ लाख २ हजार ७८० रुपयांचे अंतिम मूल्यांकन बिल आकारण्यात आल्याची माहिती महावितरणचे उपकार्यकारी अभियंता भाऊसाहेब साळुंखे यांनी दिली.
धाटवाडी येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीला दीर्घकाळ वीजपुरवठा सुरू असूनही बिलिंगबाबत प्रश्न नगरसेवक संतोष नानचे व रामचंद्र ठाकूर यांच्याकडून उपस्थित करण्यात आले होते. गरीब ग्राहकांचे थकीत वीजबिल झाल्यानंतर तत्काळ वीजजोडणी तोडली जाते; मग संबंधित बांधकामस्थळी झालेल्या वीजवापराचे बिलिंग का झाले नाही? असा सवाल नगरसेवकांकडून करण्यात आला होता.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर महावितरणकडून संबंधित वीजवापराची तपासणी करण्यात आली. त्यात १,१४४ युनिट वीजवापर चोरीच्या युनिटमध्ये नोंदविण्यात आला असून, त्याचे मूल्यांकन करून १,०२,७८० रुपयांचे अंतिम बिल निश्चित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे धाटवाडीतील वीजवापराबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना महावितरणच्या तपासणीतून अधिकृत आकडेवारी मिळाली आहे. संबंधित रक्कम वसुलीची पुढील कार्यवाही काय होते? तसेच या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली जाते का? याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.











