
कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या कुडाळ तालुक्यातील बस थांब्यांची सद्यस्थितीत मोठी दुरवस्था झाली आहे. विशेषतः पावशी आणि वाडी हूमरमळा येथील बस थांब्यांवरील लाद्या तुटल्या असून प्रवाशांना बसण्यासाठी असलेली जागा पूर्णपणे खराब झाली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ही दुरवस्था कायम असूनही संबंधित प्रशासन याकडे सातत्याने कानाडोळा करत असल्याने स्थानिक जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
महामार्गावरून दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात. मात्र, पावशी व वाडी हूमरमळा येथील बस थांब्यांवर बसण्याची सोयच उरलेली नसल्याने प्रवाशांना तासन्तास उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे. "प्रशासन या समस्येकडे डोळेझाक का करत आहे?" असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
या समस्येच्या निमित्ताने सार्वजनिक सोयी-सुविधांच्या जपणुकीचा मुद्दाही समोर येत आहे. सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या सुविधा या नागरिकांच्या सोयीसाठी बनवलेल्या असतात आणि त्यासाठी लागणारा निधी हा जनतेच्याच कराच्या पैशातून उभारला जातो. त्यामुळे या मालमत्तेची तोडफोड न करता तिचे जतन करणे हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे.
एखाद्या सार्वजनिक वास्तूची दुरुस्ती करावी लागल्यास त्यासाठी पुन्हा जनतेचाच पैसा वापरला जातो, याचे भान ठेवून सर्वांनीच या इमारती व सोयी-सुविधा सांभाळणे गरजेचे आहे.
त्वरित दुरुस्तीची मागणी
प्रशासनाने पावशी आणि वाडी हूमरमळा येथील बस थांब्यांची तातडीने दुरुस्ती करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे. तसेच नागरिकांनीही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे.











