
वैभववाडी : देशातील लोकशाहीचे संरक्षण आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा. जोपर्यंत त्यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत कथित ‘व्होटचोरी’ थांबणार नाही. त्यांनी राजीनामा न दिल्यास वैभववाडीतही आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ठाकरे युवासेनेचे जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक यांनी दिला.
यावेळी ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख नंदू शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव, दिव्या पाचकुडे, लक्ष्मण रावराणे, प्रसाद नारकर, गुलझार काझी, रोहित पावसकर, बंडू सावंत, अनिल नराम, जितेंद्र तळेकर, स्वप्नील रावराणे आदी उपस्थित होते.
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह निवडणूक आयोगाच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि घटनात्मक स्वायत्तता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा विविध मागण्यांचे निवेदन महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदार सूर्यकांत पाटील यांना देण्यात आले.
यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी बोलताना नाईक म्हणाले, देशभरात मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर कणकवली येथे मंगळवारी आंदोलन करण्यात आले. निवडणूक प्रक्रियेतील कथित व्होटचोरीमुळे संविधान आणि लोकशाहीसमोर प्रश्न निर्माण झाले आहेत. भारतीय संविधानाची प्रतिष्ठा कायम राखतानाच प्रत्येक पात्र नागरिकाच्या मतदानाच्या अधिकाराचे संरक्षण होणे आवश्यक आहे.सत्ताधाऱ्यांची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने सुरू असल्याचा आरोप करत ही प्रवृत्ती रोखण्यासाठी लोकशाहीवादी शक्तींनी एकत्र येण्याची गरज असल्याचे नाईक यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सत्ताधारी हिंदू-मुस्लिम मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांच्या कथित दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांना जनतेने बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा न दिल्यास आगामी काळात वैभववाडीत आंदोलन करण्यात येईल. लोकशाहीच्या रक्षणासाठी जनता रस्त्यावर उतरल्यास त्यामध्ये आम्हीही सहभागी होऊ, असा इशाराही नाईक यांनी दिला.












