चिपळूण : विद्या प्रसारक मंडळ ठाणे संचलित, गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथील महर्षि परशुराम इंजिनिअरींग कॉलेजला राष्ट्रीय पातळीवरील विद्यापीठाचे नॅक मानांकन मिळाले आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद यांच्या त्रिसदस्यीय समितीेेने ९ व १० डिसेंबर २०२४ ला महाविद्यालयाचे सर्वेक्षण आणि मूल्यांकन केले होते.
महाविद्यालयातील अभ्यासक्रम, अध्यापन, अध्ययन, परीक्षा मूल्यांकन, संशोधन, विस्तार कार्य, मूलभूत सुविधा, विद्यार्थी सहाय्य व प्रगती, प्रशासकिय नेतृत्व व व्यवस्थापन, संस्थापक मूल्यांकन आणि नाविन्यपूर्ण उपक्रम आदींची पाहणी करून, ' नॅक' समितीने, नॅक बी प्लस हा दर्जा बहाल केला आहे. गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथील हे नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात, सिव्हिल, इलेक्ट्रीक, मेकॅनिकल, इन्स्ट्रूमेंटेशन, कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स या सहा विभागांचा समावेश आहे.
विद्या प्रसारक मंडळ ठाणे यांचे कोकणातील महर्षि परशुराम इंजिनिअरींग महाविद्यालय हे स्थापनेनंतर कमी कालावधीत नॅक बी प्लस मानांकन मिळवणारे मुंबई विद्यापीठातील एकमेव महाविद्यालय होते. आता राष्ट्रीय स्तरावरील नॅक बी प्लस मानांकन मिळाले असल्याची माहिती राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद यांनी जाहीर केली आहे. नॅकचे मानांकन मिळाल्याबद्दल विद्या प्रसारक मंडळ, ठाणेचे अध्यक्ष
डॉ. विजय बेडेकर यांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी, पालक सर्वांचे अभिनंदन केले आहे. नॅक समिती समन्वयक म्हणून डॉ.संतोष चतुर्भुज यांनी काम पाहिले . सामूहिक प्रयत्नातून महाविद्यालयास नववर्षाची भेट मिळाली असल्याने महाविद्यालयात आनंदाचे वातावरण आहे. नॅक मानांकन च्या यशस्वीतेसाठी , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नरेंद्रकुमार सोनी, उपप्राचार्य अविनाश पवार, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.