LIVE UPDATES

मिठमुंबरी शाळेत गावठी बाजाराचे आयोजन

विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे धडे
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 22, 2026 20:02 PM
views 22  views

देवगड : विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, आर्थिक व्यवहाराचे ज्ञान तसेच स्थानिक उत्पादनांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने मिठमुंबरी शाळा नं .१ येथे गावठी बाजार उपक्रम मिठमुंबरी सरपंच बाळकृष्ण गांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी केंद्रप्रमुख देवकी फाळके, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष हेमंत तोडणकर, उपाध्यक्ष शिल्पा गांवकर, मिठमुंबरी मुख्याध्यापक मधुसुदन घोडे, शिक्षक सचिन धुरी, आरती तेली, वाळकेवाडी शाळेचे शिक्षिका वर्षा कर्ले, कातवणेश्वर शाळेचे शिक्षक सोमनाथ माने, ग्रामपंचायत सदस्य संदीप मुंबरकर, अश्मिरा गांवकर, अनिल गांवकर, माजी केंद्र प्रमुख जोईल मॅडम आदी मान्यवर तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालक, ग्रामस्थ, बीआरसी पंचायत समिती देवगड उपस्थित होते .

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्थानिक पातळीवरील विविध कृषी उत्पादने, फळे, भाज्या, घरगुती खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू आणि पारंपरिक पदार्थांचे आकर्षक स्टॉल उभारले. विद्यार्थ्यांनी ग्राहकांशी संवाद साधत वस्तूंची विक्री केली तसेच व्यवहाराचे नियोजन, हिशोब आणि विक्री कौशल्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या आठवडी बाजारात १४ हजार ३३५ रुपयांची विक्री झाली.

गावठी बाजाराला पालक, ग्रामस्थ आणि मान्यवरांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व मेहनतीचे कौतुक केले. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देतानाच विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, आत्मविश्वास आणि उद्योजकीय वृत्ती विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे उपस्थितांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच व्यवहारज्ञानाचा मौल्यवान अनुभव मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.