
दोडामार्ग : साहित्यमंथन सत्तरीतर्फे रविवार, दि. २८ जून रोजी महाराष्ट्रातील साटेली भेडशी दोडामार्ग येथे मासिक साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम साहित्यमंथनच्या सचिव समीक्षा शिरोडकर यांच्या निवासस्थानी, पांडुरंग निवास येथे दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक डॉ. प्रकाश पर्येकर उपस्थित राहणार आहेत. तसेच साटेली भेडशी ग्रामपंचायतीच्या सरपंच छाया धर्णे , यजमान अनिल मोरजकर ,साहित्यमंथन संस्थेचे अध्यक्ष गोपीनाथ गावस, कार्यक्रम संयोजक समीक्षा शिरोडकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
साहित्यमंथन सत्तरीतर्फे दर महिन्याला विविध साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. सन २०११ पासून संस्थेने पेडणे ते काणकोणपर्यंत विविध विषयांवरील साहित्यिक कार्यक्रम यशस्वीरीत्या आयोजित केले असून, साहित्यप्रेमींना एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
या कार्यक्रमात उद्घाटन सत्रानंतर दुसऱ्या सत्रात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, गोवा व महाराष्ट्रातील निवडक कवी त्यात सहभागी होणार आहेत. इच्छुक साहित्यप्रेमींनी स्वतःच्या कविता घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या साहित्यिक कार्यक्रमास साहित्यप्रेमी, लेखक, कवी, शिक्षक तसेच रसिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन साहित्यमंथन सत्तरीतर्फे करण्यात आले आहे.










