
रोहा : तालुक्यातील तांबडी बुद्रुक परिसरात बिबट्याच्या वावराने पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अजय किशन कदम यांच्या घराशेजारील वाडीजवळ रात्रीच्या अंधारात बिबट्याने पाळीव इंग्लिश जातीच्या कुत्र्यावर हल्ला करून त्याची शिकार केल्याची घटना समोर आली आहे. याच परिसरात यापूर्वीही अशाच प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पाळीव प्राण्यांवर होणारे हल्ले आता मानवी वस्तीजवळील वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावराची धोक्याची घंटा ठरत आहेत.
या घटनेची माहिती रहिवासी अजय किशन कदम यांनी दिल्यानंतर रोहा वनविभाग, मुरुड वनविभाग तसेच एसव्हीआरएसएस रेस्क्यू टीमचे सागर दहिबेकर यांना कळविण्यात आले. मात्र, घटनेची माहिती देऊनही उशिरापर्यंत वनविभागाकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वनविभागाच्या तत्परतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
विशेष म्हणजे, तांबडी बुद्रुक गाव नेमके रोहा वनपरिक्षेत्राच्या हद्दीत येते की मुरुड वनपरिक्षेत्राच्या, याबाबतही स्पष्टता होणे आवश्यक आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना घडत असताना संबंधित विभागाच्या हद्दीबाबत संभ्रम राहणे ही प्रशासनाच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. मात्र, उशिरा मुरुड वनविभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
वनविभागाच्या तत्परतेचा प्रश्न ऐरणीवर!
बिबट्याचा वावर मानवी वस्तीजवळ आढळत असताना केवळ नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करून प्रशासनाची जबाबदारी संपत नाही. अशा घटनांची तातडीने दखल घेऊन घटनास्थळाची पाहणी करणे, बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. विशेषतः यापूर्वीही अशाच घटना घडल्या असतील, तर वनविभागाने अधिक सतर्क राहणे अपेक्षित आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर!
तांबडी बुद्रुक परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी. लहान मुले आणि पाळीव प्राण्यांवर लक्ष ठेवावे, तसेच बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला हुसकावण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना वनविभागाने तातडीने घटनास्थळाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत संबंधित विभागाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आता वनविभाग या घटनेची किती गांभीर्याने दखल घेतो आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोणती पावले उचलतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










