LIVE UPDATES

कोंबड्यांच्या खुराड्यात शिरलेला बिबट्या जेरबंद

वन विभागाकडून सुखरूप नैसर्गिक अधिवासात मुक्त
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 21, 2026 03:24 PM
views 53  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

रत्नागिरी :  तालुक्यातील रानपाट गोणबरेवाडी येथे कोंबड्यांच्या खुराड्यात शिरलेल्या बिबट्याला वन विभागाने अत्यंत शिताफीने जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त केले. बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वन विभागाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला.

रानपाट गोणबरेवाडी येथील रहिवासी अनंत रामा गोनबरे यांच्या घरासमोरील कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्या जातीचा वन्यप्राणी अडकल्याची बाब समोर आली. या प्रकाराची माहिती मिळताच स्थानिक पोलीस पाटलांनी तातडीने वन विभागाशी संपर्क साधून परिस्थितीची कल्पना दिली. माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. प्रत्यक्ष पाहणी केली असता बिबट्या खुराड्यामध्ये शांत बसलेला दिसून आला.

बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पथकाने तातडीने बचाव मोहीम हाती घेतली. खुराड्याच्या दरवाजाला लोखंडी ग्रील व प्लायवूड लावून दरवाजा अर्धा बंद करण्यात आला आणि समोर लोखंडी पिंजरा लावण्यात आला. वन कर्मचाऱ्यांनी केलेल्या या नियोजनामुळे बिबट्या कोणत्याही इजा न होता थेट पिंजऱ्यात जेरबंद झाला. बिबट्या जेरबंद होताच ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

जेरबंद केलेल्या बिबट्याची जाकादेवी येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीत बिबट्या पूर्णपणे निरोगी आणि सुस्थितीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार त्याला नैसर्गिक अधिवासात सुखरूप मुक्त करण्यात आले.

ही संपूर्ण यशस्वी कारवाई रत्नागिरी-चिपळूणच्या विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मोहिमेदरम्यान परिक्षेत्र वन अधिकारी विक्रम गुरव, जाकादेवीच्या वनरक्षक शर्वरी कदम, कांदळवन कक्षाचे किरण पाचारणे व धनंजय यादव, तसेच महेश धोत्रे आणि दीपक कदम घटनास्थळी उपस्थित होते. वन विभागाने दाखवलेल्या प्रसंगावधानाबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.