LIVE UPDATES

संस्कार नॅशनल स्कूलमध्ये ‘व्हर्च्युअल विद्यापीठ’चा शुभारंभ

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 18, 2026 17:14 PM
views 31  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : जिल्ह्यातील शालेय शिक्षण क्षेत्रात अभिनव डिजिटल उपक्रमाची सुरुवात झाली असून, निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूलमध्ये ‘व्हर्च्युअल विद्यापीठ’ या उपक्रमांतर्गत स्वतंत्र OTT शैक्षणिक चॅनेलचा आज शुभारंभ करण्यात आला. व्हर्च्युअल विद्यापीठ’च्या माध्यमातून संस्कार नॅशनल स्कूलने डिजिटल शिक्षणाच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले असून, विद्यार्थ्यांच्या आधुनिक शिक्षणाला यामुळे नवी दिशा मिळणार आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सुरू करण्यात आलेल्या या डिजिटल व्यासपीठावर अभ्यासक्रमाशी संबंधित शैक्षणिक व्हिडिओ, शिक्षकांनी तयार केलेले विशेष शैक्षणिक साहित्य तसेच विद्यार्थ्यांच्या विविध सहशालेय उपक्रमांचे दर्शन घडविणारे व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. Chetana Education यांच्या पुस्तकांशी व अभ्यासक्रमाशी सुसंगत उच्च दर्जाचे शैक्षणिक व्हिडिओ विद्यार्थ्यांना या माध्यमातून पाहता येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी आपल्या सोयीनुसार आणि वेळेनुसार अभ्यास करू शकतील.

 हे व्यासपीठ वेब, Android, iOS, Android TV तसेच Fire TV अशा विविध माध्यमांवर उपलब्ध राहणार आहे.विशेष म्हणजे हे शैक्षणिक व्यासपीठ जाहिरातीविरहित, सुरक्षित आणि विद्यार्थ्यांसाठी अनुकूल असणार आहे. अनावश्यक विचलित करणाऱ्या घटकांपासून मुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचा लाभ मिळणार असून, अनुचित सामग्रीपासून संरक्षणाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. पालकांनाही मुलांच्या अध्ययन प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी, ठाणेचे चेअरमन डॉ.चंद्रशेखर जैन, चेतना एरिया मॅनेजर रेमी फर्नांडिस,चेतना पब्लिकेशन विभाग प्रमुख सागर ढवळे, संस्कार नॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रणाली रेडकर तसेच समन्वयक अजय बांदेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सायली इब्रामपूरकर यांनी केले. सूत्रसंचालन मनीष सावंत यांनी केले,तर आभार प्रियांका शिरसाट यांनी मानले.या कार्यक्रमाला पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.