LIVE UPDATES

पालकमंत्रीपद मिळाले; रायगडवर राजकीय वरचष्मा कुणाचा?

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 18, 2026 11:52 AM
views 66  views
#kokansadlive#news update#konkan update#

रुपेश रटाटे : रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला आणि मंत्री भरत गोगावले यांच्या खांद्यावर रायगडची पालकत्वाची जबाबदारी आली. गेल्या सव्वा वर्षापासून या पदावरून महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेली रस्सीखेच अखेर थांबली. मात्र, निर्णय झाला म्हणून प्रश्न संपलेले नाहीत. उलट आता काही नवे प्रश्न उभे राहिले आहेत.

सर्वात पहिला प्रश्न असा—हा निर्णय वर्षभरापूर्वीच का झाला नाही?

जर भरत गोगावले यांच्याकडेच रायगडचे पालकमंत्रीपद द्यायचे होते, तर एवढा प्रदीर्घ काळ निर्णय प्रलंबित ठेवण्यामागे नेमकी कोणती राजकीय गणिते होती? आणि जर त्या काळातच निर्णय झाला असता, तर रायगडच्या विकासकामांना, प्रशासनातील समन्वयाला आणि सत्ताधारी पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मनोबलाला अधिक फायदा झाला नसता का?

या संपूर्ण काळात रायगडच्या राजकारणात एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली—पालकमंत्रीपद हे केवळ प्रशासकीय पद राहिले नाही; ते महायुतीतील राजकीय ताकदीचे प्रतीक बनले.

एकीकडे मंत्री भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री होण्यासाठी आग्रही होते, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही या पदासाठी आग्रह असल्याचे वृत्त समोर आले होते.

आज परिस्थिती आणखी बदलली आहे.

खासदार सुनील तटकरे हे रायगडच्या राजकारणातील प्रभावशाली केंद्र आहेत. त्यांच्या कन्या अदिती तटकरे राज्य मंत्रिमंडळात आहेत आणि आता अनिकेत तटकरे यांचीही राजकीय वाटचाल अधिक मजबूत झाली आहे. त्यामुळे प्रश्न स्वाभाविक आहे—पालकमंत्रीपद भरत गोगावले यांच्याकडे आले असले, तरी रायगडच्या राजकीय समीकरणात वरचष्मा नेमका कुणाचा?

हा प्रश्न कोणत्याही एका पक्षाच्या कार्यकर्त्याचा नसून रायगडच्या राजकारणाचा आहे.पालकमंत्री म्हणून भरत गोगावले यांच्यासमोर आता खरी कसोटी आहे. कारण पद मिळणे ही पहिली पायरी आहे; त्या पदाचा प्रभाव प्रशासन, विकासकामे आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांवर दिसणे ही खरी परीक्षा आहे.

गोगावले यांची ओळख सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी लढणारा नेता अशी आहे. त्यामुळे आता रायगडमधील गोरगरीब, शेतकरी, कामगार, मच्छीमार, छोटे व्यावसायिक आणि सामान्य नागरिक यांना एकच अपेक्षा असेल—पालकमंत्रीपदाचा फायदा राजकीय प्रतिष्ठेपेक्षा जनतेच्या प्रश्नांना मिळावा.

महायुतीत दोन पक्ष, अनेक नेते आणि अनेक स्थानिक राजकीय आकांक्षा आहेत. त्यामुळे पुढील काळात विकासाच्या मुद्द्यावर ही मंडळी एकत्र दिसणार की पुन्हा राजकीय कुरघोडी, आरोप-प्रत्यारोप आणि शक्तिप्रदर्शनाची कुस्ती पाहायला मिळणार, हा खरा प्रश्न आहे.

कारण जनतेला आता कुस्ती नको, काम हवे आहे.

रायगडच्या विकासासाठी महायुती एकत्र आली तर त्याचे स्वागतच होईल. पण जर पालकमंत्रीपद एका नेत्याकडे आणि प्रत्यक्ष राजकीय प्रभाव दुसऱ्याच केंद्राकडे अशी परिस्थिती निर्माण झाली, तर प्रशासनाला नेमके आदेश कुणाचे मानायचे आणि जनतेने न्यायासाठी कुणाकडे जायचे, हा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

भरत गोगावले यांच्याकडे आता पुढील काही वर्षे रायगडचे पालकत्व राहणार आहे. त्यामुळे सुरुवातीचा कालावधी पदाच्या प्रतीक्षेत गेला असला, तरी उरलेल्या काळात त्यांना वेळ दवडण्याची मुभा नाही.

पालकमंत्री म्हणून त्यांची खरी ताकद खुर्चीत नाही, तर निर्णयक्षमतेत दिसली पाहिजे.

सुनील तटकरे यांचा राजकीय अनुभव, अदिती तटकरे यांचे मंत्रिपद आणि तटकरे कुटुंबाची वाढती राजकीय ताकद यांच्यात भरत गोगावले आपले स्वतंत्र नेतृत्व किती प्रभावीपणे उभे करतात, हे पाहणे रायगडच्या राजकारणासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.शेवटी प्रश्न एका नेत्याचा नाही.

रायगडचा पालकमंत्री कोण? यापेक्षा रायगडचा खरा पालक कोण ठरणार—हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

जनतेला महायुतीतील अंतर्गत राजकारणात रस नाही. जनतेला रस्ते हवेत, रोजगार हवा, उद्योगांमध्ये स्थानिकांना संधी हवी, शेतकऱ्यांना दिलासा हवा, पर्यटनाचा विकास हवा आणि प्रशासनाकडून न्याय हवा. 

म्हणूनच आता पाहावे लागेल पालकमंत्रीपदाची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी राजकारण होणार की रायगडची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी विकासाचे राजकारण होणार?याचे उत्तर येणारा काळच देईल.