LIVE UPDATES

ओसरगाव टोल वसुली लवकरच

१७ ऑगस्टचा मुहूर्त टळला, तांत्रिक चाचण्यांना वेग
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 18, 2026 10:35 AM
views 268  views
#kokansadlive#news update#konkan update#

कणकवली : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ओसरगाव येथील टोल नाका 17 ऑगस्ट रोजी सुरू करण्यात येणार असल्याचे  भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र सोमवारी टोल नाका सुरू झाला नाही. त्यामुळे १७ ऑगस्टचा मुहूर्त टळला आहे.

दरम्यान, टोल प्लाझा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक तांत्रिक हालचालींना वेग आला असून विविध यंत्रणांच्या चाचण्या सुरू असल्याची माहिती मिळत आहे. टोल प्लाझावरील सीसीटीव्ही कॅमेरे, बूम बॅरिअर, सर्व्हर, वाहन ओळख प्रणाली तसेच इतर तांत्रिक यंत्रणांची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत टोल नाका कार्यान्वित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील स्थानिक वाहनांना टोलमाफी देण्यात येईल, अशी घोषणा यापूर्वी केली आहे. त्यामुळे स्थानिक वाहनधारकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

मात्र टोल सुरू झाल्यानंतर सिंधुदुर्गातील स्थानिक वाहनांना टोलमाफीसाठी नेमकी कोणती लेन वापरावी लागणार, वाहनांची ओळख कशी निश्चित केली जाणार आणि सिंधुदुर्गमध्ये ट्रान्सफर झालेल्या वाहनांना टोलमाफीचा लाभ कशा पद्धतीने मिळणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.

टोल वसुलीची प्रत्यक्ष सुरुवात कधी होणार आणि स्थानिक वाहनांसाठी टोलमाफीची नेमकी कार्यपद्धती काय असेल, याकडे आता सिंधुदुर्गवासीयांचे लक्ष लागले आहे.