
सिंधुदुर्गनगरी : मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथे सुरू करण्यात आलेल्या टोलवसुलीला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसने तीव्र विरोध केला आहे. महामार्गाचे काम अद्याप अनेक ठिकाणी अपूर्ण असताना जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात टोलवसुली सुरू करणे अन्यायकारक असल्याचे सांगत हा टोल जिल्ह्याच्या वेशीवर हलवावा, तसेच महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत टोलवसुली बंद ठेवावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
सोमवारी, १७ ऑगस्ट रोजी ओसरगाव टोलनाक्यावर टोलवसुली सुरू करण्यात आली होती. यावेळी जिल्ह्यातील स्थानिक वाहनधारकांकडूनही टोल आकारण्यात आल्याची माहिती काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिली. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी टोल व्यवस्थापनाकडे विचारणा केली असता, व्यवस्थापनातील श्री. आपटे यांनी ही केवळ ‘ट्रायल’ असल्याचे सांगितले होते.
यानंतर मंगळवारी जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाला पूर्वसूचना देत ओसरगाव टोल कार्यालयात जाऊन व्यवस्थापनाशी चर्चा केली. महामार्गाची कामे अपूर्ण असताना जिल्हावासीयांवर टोलची सक्ती करू नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावर टोल सुरू करणार नसल्याचे व्यवस्थापनाकडून तोंडी सांगण्यात आले असून, आठवडाभरात लेखी उत्तर देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे काँग्रेसने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक ठिकाणी अद्याप कामे अर्धवट असून काही भागांची दुरवस्था झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. त्यामुळे महामार्ग पूर्ण होईपर्यंत टोलवसुली करू नये, अशी मागणी यापूर्वीही जिल्हाधिकारी तसेच संबंधित प्रशासनाकडे करण्यात आली होती. ओसरगावऐवजी टोलनाका जिल्ह्याच्या वेशीवर उभारल्यास स्थानिक वाहनधारकांवरील आर्थिक भार कमी होईल, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.
ओसरगाव हे जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात असल्याने स्थानिक वाहनधारकांना वारंवार टोल भरावा लागू शकतो. त्यामुळे टोल कर्मचारी आणि स्थानिक वाहनधारक यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही गंभीर ठरू शकते. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण व IRB कंपनी व्यवस्थापनाला तातडीने योग्य त्या सूचना देऊन स्थानिक नागरिकांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत ओसरगाव येथील टोलवसुली बंद ठेवण्याच्या सूचना IRB कंपनीला द्याव्यात, अशी मागणी पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी आणि टोल व्यवस्थापनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, प्रकाश जैतापकर, देवानंद लुडबे, बाळू मेस्त्री, अतिश जेठे, जेम्स फर्नांडीस, महेश परब, सरदार ताजर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.










