
सिंधुदुर्गनगरी : शेतकरी आणि पशुपालकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने यंदा कृषी व पशुसंवर्धन विभागासाठी तब्बल ३ कोटी ६७ लाख रुपयांची तरतूद केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत कृषी विभागाच्या निधीत लक्षणीय वाढ करून १ कोटी ७० लाख रुपये, तर पशुसंवर्धन विभागासाठी १ कोटी ९७ लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या निधीतून विविध योजनांद्वारे शेतकरी, महिला, पशुपालक तसेच गरजू लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अनुदानाचा लाभ मिळणार आहे.
जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नातून राबविण्यात येणाऱ्या या योजनांसाठी लाभार्थ्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत ग्रामपंचायतीमार्फत संबंधित पंचायत समितीकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती तुकाराम उर्फ दादा साईल यांनी केले.
उपाध्यक्षांच्या दालनात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दादा साईल यांनी कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती दिली. यावेळी राज्य कृषी उपसंचालक ज्ञानेश्वर बडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी दिशांत कोळप आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सुधाकर ठाकूर उपस्थित होते.
गतवर्षी कृषी विभागासाठी ९३ लाख ३० हजार रुपयांची तरतूद होती. यंदा ती वाढवून १ कोटी ७० लाख करण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभागाची गतवर्षीची १ कोटी ७ लाखांची तरतूद यंदा वाढून १ कोटी ९७ लाखांवर पोहोचली आहे. वाढीव निधीमुळे अधिक लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविणे शक्य होणार असल्याचे दादा साईल यांनी सांगितले.
कृषी अवजारांसाठी ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान
कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी मेळावे व प्रदर्शनांसाठी ४ लाख, पीक संरक्षण औषधांसाठी १० लाख, सुधारित बियाणे, रोपे व कलमांच्या खरेदी-वितरणासाठी ६ लाख ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पीक संरक्षण अवजारांसाठी ७५ टक्के अनुदानावर २५ लाख रुपये, सुधारित कृषी अवजारांसाठी ७० लाख रुपये, सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी १० लाख, वनव्यामुळे नुकसान झालेल्या फळबागा व पिकांसाठी १५ लाख, तर शेती अभिवृद्धी व सुधारणेसाठी प्रोत्साहनपर ३० लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
शेळीपालन, दुग्धव्यवसायाला मोठी चालना
पशुसंवर्धन विभागाच्या योजनांनाही यंदा मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे. ७५ टक्के अनुदानावर ५ शेळ्या व १ बोकडाचा गट देण्यासाठी ४१ लाख ५२ हजार ८०० रुपयांची तरतूद आहे. महिला सबलीकरणासाठी याच योजनेत आणखी ३० लाख २६ हजार ४०० रुपये उपलब्ध आहेत.
विद्युतचलित कडबा कुट्टी यंत्रासाठी ७५ टक्के अनुदानावर ६ लाख १२ हजार, फॅट टेस्टिंग मशीनसाठी ९० टक्के अनुदानावर ३ लाख २४ हजार, तर दोन दुधाळ जनावरांच्या पुरवठ्यासाठी ४० टक्के अनुदानावर तब्बल ६० लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
महिला सबलीकरणाच्या दृष्टीने सुधारित जातीच्या ८ ते १० आठवडे वयाच्या २५ तलंगा व ३ नर कोंबड्यांचा गट देण्यासाठी ९० टक्के अनुदानावर ११ लाख २५ हजार रुपयांची तरतूद आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी हत्यारे, उपकरणे व फर्निचरसाठी ५ लाख रुपये, तसेच खोडा पुरविण्यासाठी ५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अनुसूचित जाती-जमातींसाठीही विशेष तरतूद
विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांच्या खाद्याचा पुरवठा करण्यासाठी ५ लाख रुपये ठेवण्यात आले आहेत. अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी ७५ टक्के अनुदानावर १० शेळ्या व १ बोकडाचा गट देण्यासाठी ५ लाख रुपयांची तरतूद आहे.
१५ दिवसांत छाननी; महिलांना प्राधान्य
अर्ज प्राप्त झाल्यानंतर सुमारे १५ दिवसांत छाननी करून पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. विधवा आणि एकल महिलांना प्राधान्य देण्यात येणार असून, संबंधित योजनांच्या निकषानुसार लाभार्थी हिस्सा आणि अनुदानाच्या प्रमाणात योजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालक, महिला आणि गरजू लाभार्थ्यांनी उपलब्ध योजनांची माहिती घेऊन ३० सप्टेंबरपूर्वी अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन दादा साईल यांनी केले.











