
कुडाळ : कुडाळ शहराचा प्रारूप विकास आराखडा हा शहराच्या भविष्यातील नियोजनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. या प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग आणि विश्वास हेच नगरपंचायतीचे सर्वोच्च प्राधान्य असून, विकास आराखड्याबाबत कोणत्याही प्रकारची घाई, बळजबरी अथवा नागरिकांवर अन्याय होईल असा निर्णय घेतला जाणार नाही, अशी ग्वाही कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी दिली आहे.
नगरपंचायत प्रशासनाने प्रारूप विकास आराखड्याची माहिती जाहीर प्रकटनाद्वारे नागरिकांसमोर ठेवली आहे. नागरिकांना ही माहिती सहज मिळावी या उद्देशाने शहरातील प्रत्येक वॉर्डातील प्रमुख चौकांमध्ये प्रारूप आराखड्याची माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. सध्या नागरिकांच्या हरकती व सूचना नियमानुसार स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून, नगरपंचायत कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या हरकतींची व्यवस्थित नोंद घेतली जात आहे, तसेच त्यांच्या शंकांचे निरसनही प्रशासनाकडून केले जात आहे.
नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांनी स्पष्ट केले की, सर्व नागरिकांच्या सूचना, हरकती आणि मते यांचा कायद्यानुसार व वस्तुनिष्ठपणे विचार करूनच पुढील कार्यवाही केली जाईल. कुडाळ शहराचा विकास हा सर्वांच्या सहभागातून व्हावा हीच नगरपंचायतीची भूमिका आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा गैरसमजांना बळी न पडता, केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा आणि आपल्या सूचना व हरकती नियोजित मुदतीत नगरपंचायतीकडे सादर कराव्यात.
"नगराध्यक्ष म्हणून मी सर्व नागरिकांना आश्वस्त करते की, प्रारूप विकास आराखड्याबाबत प्रत्येक नागरिकाच्या न्याय्य हिताचे पूर्ण संरक्षण केले जाईल. ही सर्व प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, कायदेशीर आणि लोकाभिमुख पद्धतीनेच राबविली जाईल."
प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, नगराध्यक्षा, कुडाळ












