
कुडाळ :"राजकारणातील तत्त्वनिष्ठ तपस्वी म्हणजे प्रा. मधु दंडवते. कोकण विकास, कोकण रेल्वे आणि प्रा. दंडवते यांचे अजोड नाते आहे," असे प्रतिपादन बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी केले. प्रा. मधु दंडवते यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुडाळ रेल्वे स्टेशन येथे त्यांना आदरांजली वाहण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, कोकण विकासाचा आणि कोकण रेल्वेच्या योगदानाचा विषय निघाला की प्रा. मधु दंडवते यांचे नाव कधीही दुर्लक्षित करता येणार नाही. बॅरिस्टर नाथ पै आणि कोकणी माणसांचे कोकण रेल्वेचे स्वप्न प्रा. मधु दंडवते व जॉर्ज फर्नांडिस या जोडीमुळेच शक्य झाले. यावेळी त्यांनी अर्थतज्ज्ञ, समाजवादी विचारसरणीचे लोकनेते, साधे राहणीमान व उच्च विचारसरणी असलेल्या प्रा. दंडवते यांच्या कार्याचा उपस्थितांना परिचय करून दिला.
विविध रेल्वे स्थानकांमध्ये प्रा. दंडवते यांच्या प्रतिमेचे अनावरण करून प्रवाशांना त्यांच्या योगदानाची सतत जाणीव करून देण्याच्या उद्देशाने उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सावंतवाडी व कुडाळ रेल्वे स्थानकात प्रा. मधु दंडवते यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, कुडाळ रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर सुरेंद्र राजापकर, कोकण रेल्वेचे कर्मचारी मनोहर चव्हाण, दत्ताराम चव्हाण, प्रा. अरुण मर्गज, प्रा. परेश धावडे आदी उपस्थित होते.
तसेच सावंतवाडी रेल्वे स्थानकावरही सावंतवाडी रेल्वे स्टेशन मास्टर, परेश धावडे, प्रसाद कानडे, सुनील गोसावी, ज्ञानेश्वर तेली, दिनार गाळवणकर आणि नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. याशिवाय बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या प्रांगणातही संस्थाध्यक्ष, विविध विभागांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि रेल्वे प्रवाशांच्या उपस्थितीत प्रा. दंडवते यांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








