LIVE UPDATES

चोरांच्या आव्हानाला धाडसाने सामोरे जाणाऱ्या अभय आणि रामदास आयरेकर यांचा सत्कार

कुडाळ स्टेट बँक दरोडा प्रकरण : बाजारपेठ मित्र मंडळ व मारुती मंदिर कमिटी यांच्या वतीने सत्कार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 17, 2026 06:50 PM
views 255  views

​कुडाळ : शहरात नुकत्याच घडलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील दरोड्याच्या थरारक प्रसंगी दाखवलेले अतुलनीय धाडस आणि प्रसंगावधान दाखवत आरोपींना पकडण्यासाठी जीवाची बाजी लावणारे अभय उर्फ पांडुरंग आयरेकर आणि रामदास आयरेकर यांचा बाजारपेठ मित्र मंडळ व मारुती मंदिर कमिटी यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या या धाडसी व शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल संपूर्ण शहरातून त्यांचे कौतुक होत आहे.

​कुडाळ पानबाजार येथील स्टेट बँकेत दिवसाढवळ्या घडलेल्या दरोड्याच्या वेळी या दोन्ही धाडसी तरुणांनी जीवाची पर्वा न करता चोरांचा मुकाबला केला होता. त्यांच्या याच तत्परतेमुळे आणि सतर्कतेमुळे दरोडेखोराला पळून जाण्यात अपयश आले आणि लाखो रुपयांची रोकड सुरक्षितपणे परत मिळणे शक्य झाले. नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी घेतलेली ही जोखीम खरोखरच कौतुकास्पद ठरली.

​या दोन्ही बहाद्दरांच्या सामाजिक आणि धाडसी कार्याचा गौरव करण्यासाठी बाजारपेठ मित्र मंडळ आणि मारुती मंदिर कमिटीच्या वतीने एका विशेष सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आणि ग्रामस्थांनी अभय उर्फ पांडुरंग आयरेकर व रामदास आयरेकर यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. या सत्कार सोहळ्यामुळे कुडाळ शहरात एकच चर्चा असून, या तरुणांच्या धाडसाने संपूर्ण तालुक्याची मान अभिमानाने उंचावली आहे.