
कुडाळ : पावसाचा अभाव आणि तीव्र उन्हामुळे कुडाळ तालुक्यातील भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून पिके पूर्णपणे करपून गेली आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी आज तालुक्यातील रानबांबुळी, कसाल, अणाव आणि पावशी या गावांमध्ये जाऊन बाधित भातशेतीची प्रत्यक्ष पाहणी केली.
पाहणीनंतर बोलताना आमदार निलेश राणे यांनी सांगितले की, आज सकाळीच पालकमंत्र्यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सर्व वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. या बैठकीत बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत पोहोचवण्यासाठी प्रशासनाला योग्य ते आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही तांत्रिक अडचणी न दाखवता कोकणातील शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी, यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे, अशा स्पष्ट सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात राज्य सरकारकडून तातडीने मदत केली जाईल, आणि त्यानंतर एनडीआरएफ (NDRF) व केंद्र सरकारकडून उर्वरित मदत दिली जाणार असल्याचे आमदार राणे यांनी स्पष्ट केले. येणाऱ्या काळात संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आवश्यक तिथे टँकरची सुविधा सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच तळे, बंधारे आणि नैसर्गिक जलस्रोत टिकवून ठेवण्याबाबत सविस्तर चर्चा झाली असून, ज्या कामांसाठी निधीची गरज होती तिथे पालकमंत्र्यांनी तात्काळ निधी उपलब्ध करून दिला आहे. या पाहणी दौऱ्यात जिल्हा उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर, रुपेश कानडे, सुप्रिया वालावलकर, राजन परब, काका कुडाळकर, मिलिंद नाईक, तसेच तालुका कृषी अधिकारी भास्कर चौगुले, प्रांत अधिकारी ऐश्वर्या काळूशे, तहसीलदार सचिन पाटील यांच्यासह विविध विभागांचे शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










