LIVE UPDATES

दुष्काळाच्या यादीत चिपळूणचा तातडीने समावेश करा : आमदार शेखर निकम

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: September 27, 2026 18:31 PM
views 26  views

चिपळूण : राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये शासनाने प्रथम कळ (Trigger-1) लागू करून दुष्काळी परिस्थिती जाहीर केली असताना, प्रत्यक्षात गंभीर पर्जन्यतूट व पिकांचे मोठे नुकसान झालेल्या चिपळूण तालुक्याचा या यादीत समावेश झालेला नाही. त्यामुळे चिपळूण तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत तातडीने समावेश करून शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार सर्व सवलती व उपाययोजना लागू कराव्यात, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तसेच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शासनाच्या २५ सप्टेंबर २०२६ रोजीच्या निर्णयानुसार राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये प्रथम कळ (Trigger-1) लागू करण्यात आली आहे. मात्र, या यादीत चिपळूण तालुक्याचा समावेश झालेला नाही. प्रत्यक्ष पर्जन्यमान, महसूल मंडळनिहाय पावसाची तूट, पावसाचे असमान वितरण आणि भात-नाचणी पिकांच्या वाढीच्या विविध अवस्थांवर झालेला परिणाम लक्षात घेता चिपळूणमध्ये परिस्थिती गंभीर असल्याचे आ. निकम यांनी निवेदनात नमूद केले आहे.

जूनमध्ये केवळ ६२.१ टक्के पाऊस

निवेदनानुसार, जून महिन्यात चिपळूण तालुक्यात सरासरी २८०.९० मिमी पर्जन्यमानाच्या तुलनेत केवळ ६२.१ टक्के पाऊस झाला. त्यामुळे भात व नागली पिकांची पेरणी आणि रोपणीची कामे मोठ्या प्रमाणात विलंबाने सुरू झाली. त्यानंतर १० जुलैपासून सुमारे आठवडाभर पावसाने खंड दिल्याने रोपणी तसेच पिकांच्या सुरुवातीच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम झाला.

सप्टेंबर महिन्यातही पावसाची स्थिती चिंताजनक राहिली. तालुक्याची सरासरी पर्जन्यमानाची नोंद ४२९.४० मिमी असताना आजअखेर केवळ १९१.६० मिमी म्हणजेच ४४.५ टक्के पाऊस झाला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सात महसूल मंडळांत गंभीर पर्जन्यतूट

तालुक्याची एकूण पर्जन्यमानाची सरासरी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक दिसत असली, तरी महसूल मंडळनिहाय पावसाच्या वितरणात मोठी तफावत आहे. विशेषतः सप्टेंबरमध्ये सात महसूल मंडळांत गंभीर पर्जन्यतूट नोंदविण्यात आली आहे. यामध्ये मार्गताम्हाणे २४.६ टक्के, रामपूर ३२.४ टक्के, वहाळ ३३.९ टक्के, निवळी ३९.९ टक्के, कळकवणे ४२.१ टक्के, सावर्डे ४३.४ टक्के आणि असुर्डे ४६.६ टक्के पर्जन्यतूट असल्याचे निवेदनात नमूद आहे.

भात पिकाला मोठा फटका

चिपळूण तालुक्यात भात पिकाखालील एकूण क्षेत्र ६ हजार ७३०.९४ हेक्टर आहे. सध्या विविध भागांत भात पीक दाणे भरणी, फुलोरा व पोटरी यांसारख्या संवेदनशील अवस्थेत आहे. मात्र, पावसाच्या खंडामुळे या सर्व अवस्थांवर विपरीत परिणाम झाला आहे.

हळवी वाणे सध्या दाणे भरणीच्या (Grain Filling Stage) संवेदनशील अवस्थेत असून पावसाअभावी पोचट दाण्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादनात ४० ते ४५ टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

निमगरवी वाणे फुलोरा अवस्थेत असून पावसाच्या तुटवड्यामुळे फुलोऱ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. परिणामी उत्पादनात ४५ ते ५० टक्के घट होण्याचा अंदाज आहे. तर गरवी वाणे पोटरी अवस्थेत असून या अत्यंत नाजूक टप्प्यावर पावसाअभावी लोंब्या बाहेर पडण्यास तसेच फुलोऱ्यास अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे उत्पादनात ५० ते ६० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

एकूण भात उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट होण्याची शक्यता

भात पिकाच्या पेरणी, रोपणी, फुटवे फुटणे, पोटरी आणि दाणे भरणी या महत्त्वाच्या तांत्रिक टप्प्यांवर पावसाचा खंड पडल्याने तालुक्याच्या एकूण भात उत्पादनात सरासरी ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट होण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे केवळ कागदावरील तांत्रिक निकष न पाहता शेतावरील प्रत्यक्ष परिस्थितीचा वस्तुनिष्ठ विचार करावा, अशी मागणी आ. निकम यांनी केली आहे.

दुष्काळी सवलती चिपळूणला लागू करण्याची मागणी

“तांत्रिक निकषानुसार चिपळूण तालुका प्रथम कळ (Trigger-1) मध्ये पात्र ठरत नसला, तरी प्रत्यक्ष शेतावरील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत. त्यामुळे चिपळूण तालुक्यातील पिकांच्या वाढीच्या अवस्थेतील हानी, पावसाचा खंड, असमान वितरण तसेच संभाव्य ५० टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादन घट या सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक व वस्तुनिष्ठ विचार करावा,” अशी मागणी आ. निकम यांनी केली आहे.

तसेच चिपळूण तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत तातडीने समावेश करावा आणि शासन निर्णयानुसार दुष्काळग्रस्त तालुक्यांना अनुज्ञेय असलेल्या सर्व सवलती व उपाययोजना चिपळूण तालुक्यास लागू कराव्यात, अशी स्पष्ट मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.