LIVE UPDATES

देवरूखच्या मध्यवर्ती भागात बिबट्याचा वावर

हायस्कूलसमोर बिबट्या रस्त्यावर बसला ठाण मांडून | नागरिक भयभीत
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: September 27, 2026 18:44 PM
views 18  views

देवरूख : शांत आणि निसर्गरम्य अशी ओळख असलेल्या देवरूख शहरात वन्यप्राण्यांचा वावर वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी शहर परिसरात रानगवा आढळून आल्यानंतर आता शुक्रवारी रात्री देवरूख हायस्कूलसमोरील मुख्य रस्त्यावर बिबट्या दिसल्याची घटना समोर आली आहे. शहराच्या मध्यवर्ती आणि वर्दळीच्या परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शुक्रवारी रात्रीच्या सुमारास देवरूख हायस्कूलसमोरून जाणाऱ्या काही नागरिकांना रस्त्यावर बिबट्या दिसून आला. काही काळ बिबट्याचा या परिसरात वावर असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हायस्कूल तसेच महाविद्यालय परिसरामुळे या भागात दिवसभर नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे अशा ठिकाणी बिबट्या आढळून आल्याने पालकांसह स्थानिक नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. देवरूख शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून रानगव्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यातच आता शहरातील मुख्य रस्त्यालगत बिबट्याचे दर्शन झाल्याने वन्यप्राण्यांचा शहराकडे वाढता वावर हा चर्चेचा विषय बनला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या परिसरातून पायी जाणाऱ्या नागरिकांनी तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

दरम्यान, बिबट्याच्या वावराची वनविभागाने तातडीने दखल घेऊन परिसरात गस्त वाढवावी, बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. शाळा परिसरात विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असल्याने त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वनविभाग आणि प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे