LIVE UPDATES

डेंग्यूचा वाढता धोका; जेट्टी परिसर डासमुक्त ठेवण्याचे आवाहन

मच्छीमार, नौका मालक, खलाशी, मासळी विक्रेते व व्यावसायिकांना स्वच्छतेच्या उपाययोजनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: September 27, 2026 16:53 PM
views 10  views

देवगड : देवगड तालुक्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मच्छीमार, नौका मालक, खलाशी, कामगार, मासळी विक्रेते, व्यापारी तसेच मासळी व्यवसायाशी संबंधित सर्वांनी जेट्टी परिसर स्वच्छ, कोरडा आणि डासमुक्त ठेवण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे यांनी केले आहे.

देवगड तालुक्यात सध्या डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असून, त्यामध्ये मत्स्यव्यवसायाशी संबंधित मच्छीमार, खलाशी, कामगार, नौका मालक तसेच मासळी खरेदीदारांचाही समावेश असल्याचे निदर्शनास येत आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव वेळीच नियंत्रित न केल्यास त्याचा परिणाम मच्छीमार, खलाशी, कामगार यांच्यासह मासेमारी व्यवसायावर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या आरोग्यावर आणि उपजीविकेवर होण्याची शक्यता आहे.डेंग्यू हा एडीस डासाच्या माध्यमातून पसरणारा विषाणूजन्य आजार असून पावसाळ्यात विविध ठिकाणी साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असते. त्यामुळे जेट्टी परिसर, रॅम्प, मासळी उतरविण्याची ठिकाणे, नौका तसेच मासळी व्यवसायाशी संबंधित जागांमध्ये पाणी साचणार नाही, याची विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे.मासळी उतरविल्यानंतर रॅम्पवरील घाण पाणी आणि माशांचे अवशेष तातडीने साफ करावेत. जेट्टी परिसरात पाणी साचलेल्या जागा त्वरित कोरड्या कराव्यात. रॅम्प तसेच परिसरात आवश्यकतेनुसार ब्लिचिंग पावडर किंवा फिनाइलचा वापर करून स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नौका मालकांनी आपल्या मासेमारी नौका तसेच नौकेवरील साहित्याची नियमित पाहणी करून पावसामुळे साचलेले पाणी तात्काळ काढून टाकावे. नौकेच्या तळाशी, इंजिन रूममध्ये किंवा साहित्य ठेवण्याच्या ठिकाणी पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. जाळी व ताडपत्री वापरताना त्यामध्ये पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी. जाळ्या नियमितपणे उन्हात वाळवून स्वच्छ ठेवाव्यात.

नौका दुरुस्तीमधून निर्माण होणारा फायबर, प्लास्टिक व इतर कचरा जेट्टी परिसरात पडून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. अनावश्यक क्रेट, पाण्याचे ड्रम, टायर, प्लास्टिक वस्तू तसेच इतर पाणी साचविणाऱ्या वस्तूंची योग्य विल्हेवाट लावावी. रिकामे ड्रम, कंटेनर व भांडी उलटी करून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत, जेणेकरून त्यामध्ये पावसाचे पाणी साचणार नाही.

मासळी विक्रेते व व्यापाऱ्यांनी मासळीची घाण जेट्टी परिसरात साचू न देता योग्य ठिकाणी नेऊन विल्हेवाट लावावी. मासळी विक्रीसाठी वापरले जाणारे क्रेट, ट्रे व अन्य साहित्य नियमितपणे स्वच्छ करावे. जेट्टी परिसर घाणमुक्त, स्वच्छ व कोरडा ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.

तसेच घराभोवती व कामाच्या ठिकाणी फुलदाण्या, टायर, प्लास्टिक वस्तू, बांधकाम साहित्य आदी ठिकाणी पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी. पाण्याच्या टाक्या, ड्रम व अन्य साठवणूक भांडी नियमितपणे स्वच्छ करून झाकून ठेवावीत. डासांचा दंश टाळण्यासाठी पूर्ण बाह्यांचे कपडे वापरावेत. आवश्यकतेनुसार डास प्रतिबंधक मलम किंवा स्प्रेचा वापर करावा. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा.

अचानक ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, उलटी, अंगावर पुरळ येणे यांसारखी लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःहून औषधोपचार करू नयेत. डेंग्यूची लागण झालेल्या व्यक्तीला डास चावणार नाही, याचीही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

आरोग्य आणि मासेमारी व्यवसायाच्या हितासाठी जेट्टी परिसर स्वच्छ, कोरडा व डासमुक्त ठेवणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. सर्व मच्छीमार, नौका मालक, खलाशी, कामगार, मासळी विक्रेते, व्यापारी व नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे यांनी केले आहे.