
कुडाळ : 'एल निनो'च्या प्रभावामुळे वाढलेली तीव्र उष्णता आणि उन्हाचा चटका लक्षात घेता, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद व माध्यमिक शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. सर्व शाळा आता सकाळच्या सत्रात भरू लागल्या असून, यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना उन्हाच्या त्रासापासून मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात सातत्याने वाढणाऱ्या तापमानामुळे दुपारच्या वेळी लहान मुलांना शाळेतून ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. ही गंभीर बाब लक्षात घेऊन कुडाळ नेरूरचे जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) रवींद्र खेबूडकर यांची भेट घेऊन त्यांना एक विशेष निवेदन सादर केले होते.
या निवेदनात त्यांनी मुलांचे आरोग्य आणि उन्हाची तीव्रता पाहता शाळांची वेळ सकाळची करण्याची आग्रही मागणी केली होती. आलेल्या निवेदनाची गांभीर्याने आणि तात्काळ दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर यांनी जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळांना आपल्या वेळापत्रकात बदल करण्याच्या सूचना व आदेश जारी केले.
सीईओंच्या या आदेशानंतर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांचे सत्र सकाळचे करण्यात आले आहे. दुपारच्या कडक उन्हाच्या आधीच शाळा सुटत असल्याने लहान मुलांना उन्हाच्या चटक्यापासून आणि उष्माघाताच्या धोक्यापासून संरक्षण मिळाले आहे. जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्याबद्दल आणि प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेबद्दल जिल्ह्यातील पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधून अत्यंत समाधान व्यक्त केले जात आहे.










