LIVE UPDATES

....तर गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा : वैभव नाईक

निलेश राणेंच्या आरोपांवर प्रत्युत्तर
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: May 31, 2026 13:30 PM
views 25  views

कुडाळ : माजी आमदार वैभव नाईक यांनी आमदार निलेश राणे यांच्या पत्रकार परिषद वर भाष्य करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिसांकडून महिन्याला २ कोटी रुपयांचा हप्ता दिला जातो, असा खळबळजनक आरोप सत्ताधारी शिंदे गटाचे कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेतून केला.  निलेश राणेंच्या या विधानामुळे विरोधी पक्षाच्या आरोपांना पुष्टी मिळाली असून, जर खरोखरच असा हप्ता गृह खाते घेत असेल, तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी जोरदार मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. तसेच निलेश राणेंनीही आपल्या आरोपांवर ठाम राहून याचे उत्तर गृह खात्याकडून मिळवून ते जनतेला सांगावे, असे आव्हान त्यांनी दिले.

माजी आमदार वैभव नाईक यांनी बोलताना आमदार निलेश राणे, पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारवर चौफेर टीका केली. पोलीस अधीक्षकांच्या आडून गृहमंत्री फडणवीसांना टार्गेट केलं आहे.  "निलेश राणे हे ५ वर्षे खासदार राहिले असून आता २ वर्षे आमदार आहेत. माझ्या अनुभवानुसार, एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याबद्दल सत्ताधारी लोकप्रतिनिधीची तक्रार असेल, तर आधी संबंधित मंत्र्यांकडे दाद मागावी लागते. तिथे कारवाई झाली नाही तर विधिमंडळात आवाज उठवून चौकशी लावली जाते. निलेश राणेंनी आधी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांची तक्रार करायला हवी होती. परंतु, पोलीस अधीक्षकांच्या आडून त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट केले आहे.

सिंधुदुर्गातील अवैध धंद्यांवरून निलेश राणेंनी केलेल्या भाष्याचा समाचार घेताना वैभव नाईक म्हणाले की, निलेश राणेंचेच मालवणमधील नगरसेवक तेथील बंद पडलेली मटका बुकी चालवत आहेत. मूळ मटका बुकी चालकाच्या निधनानंतर शिंदे गटाच्या नगरसेवकांनी ही बुकी ताब्यात घेतली आहे. निलेश राणेंना माहित नसेल तर मी त्यांची नावेही जाहीर करेन, अन्यथा मालवणात कोणालाही विचारले तरी ती नावे समजतील. एकीकडे अवैध धंद्यांवर बोलायचे आणि दुसरीकडे स्वतःचेच नगरसेवक अवैध धंदे करत असताना त्यांच्यावर निलेश राणे कारवाई का करत नाहीत? की, त्या मटका बुकी चालक नगरसेवकांकडे पोलीस हप्ते मागतात म्हणून राणे पोलीस अधीक्षकांवर आरोप करत आहेत? असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला.

माझ्यावर कोणताही वैयक्तिक आकस नसल्याचा दावा निलेश राणे करत असले, तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटना प्रकरणात त्यांनी माझ्यावर वैयक्तिक आकसापोटीच खोटे आरोप केले होते, असे नाईक म्हणाले. आम्ही जनहिताचे कोणतेही आंदोलन केले की निलेश राणे आणि त्यांचे कार्यकर्ते पोलिसांवर दबाव आणून माझ्यावर गुन्हे दाखल करायला लावतात. ते माझे राजकीय विरोधक आहेत, त्यांनी माझ्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी मला फरक पडत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वैभव नाईक यांनी निलेश राणेंच्या राजीनाम्याचे आव्हान देताना सांगितले की, माझे दोन्ही नगरसेवक भाऊ कणकवलीत सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यांच्या विजयात निलेश राणेंचा केसाएवढाही वाटा असेल, तर मी उद्याच त्यांचा राजीनामा द्यायला लावेन. उलट, निलेश राणे ज्यांच्या पाठिंब्यामुळे निवडून आले, त्याच भाजपवर आणि राज्याच्या गृह खात्यावर ते गंभीर आरोप करत आहेत. त्यामुळे निलेश राणेंनी आधी स्वतःच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि भाजपच्या पाठिंब्याशिवाय निवडून येण्याची हिंमत दाखवावी, असा घणाघात वैभव नाईक यांनी केला. आता राजकीय वातावरण सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगलेच तापण्याची चिन्हे दिसून येत आहेत.