
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सध्या 'व्हेंटीलेटर'वर असल्यासारखी स्थिती आहे. जनतेला परिपूर्ण आरोग्यसेवा देण्यात पालकमंत्री असमर्थ ठरले आहेत. त्यांना जनतेच्या आरोग्याशी काही देणे-घेणे नाही, अशी स्थिती आहे. त्यांच्या मतदारसंघातही वैद्यकीय अधीक्षकसह डॉक्टरांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असून, नाहक आर्थिक भुर्द ड पडत आहे, अशी टीका माजी आमदार, ठाकरे शिवसेनेचे नेते परशुराम उपरकर यांनी केली आहे.
येथील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. उपरकर म्हणाले, पालकमंत्र्यांच्या मतदारसंघासहीत जिल्हयात डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. आता सावंतवाडी येथील वैद्यकीय अधीक्षक पद रिक्त होईल. तेथील सुमारे १४ पदे रिक्त आहेत. याशिवाय कणकवलीतही दहा ते बारा पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे जनतेला योग्य आरोग्य सेवा मिळत नाही. त्यांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे.
अनेक खासगी रुग्णालयांमध्ये केलेल्या उपचारांची बिलेही रुग्णांना दिली जात नाहीत. त्यामुळे रुग्णांची लूटमार सुरू आहे. मात्र, ही यंत्रणा सुरळीत करण्यासाठी पालकमंत्री कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाहीत. मेडिकल कॉलेजमधून रुग्णांना चांगली, दर्जेदार सेवा मिळण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. या कॉलेजमध्ये त्यांचे अनेक कार्यकर्ते नोकरीला आहेत. ते पगार पूर्णवेळचा घेतात. मात्र, कामावर कधीतरीच येतात, असा प्रकार सुरू असल्याचा आरोप श्री. उपरकर यांनी केला.
जलवाहतुकीच्या रो-रो सेवेसाठी २ कोटी ९३ लाखाचे डिझेल देण्यात आले. मात्र या सेवेचे काय झाले, ते सर्वज्ञात आहे. महावितरणच्या बैठका घेऊन सूचना देण्यात आल्या. मात्र, एवढे करून कोणताही फरक पडलेला नाही. काँग्रेससह इतर पक्षांनी केलेल्या आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारीही सहभागी झाले होते. म्हणजेच पालकमंत्री येथील प्रश्नांकडे लक्ष देत नाहीत, हे स्पष्ट होते, अशी टीका श्री. उपरकर यांनी केली,
खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवस कार्यक्रमाला केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी हायवे मे महिनाअखेर पूर्ण करण्याची ग्वाही दिली होती. मात्र, गडकरी येतात आणि केवळ लॉलीपॉप देऊन जातात. हायवेचे अद्यापही काम अपूर्ण आहे. गडकरी यांनी कणकवलीच्या दौऱ्यात हायवेचे काम पूर्ण करू, पण उद्घाटनाला आपण येणार नसल्याचे सांगितले होते. त्यावेळीच पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होऊ शकणार नाही, याची कल्पना आली होती, असा टोलाही श्री. उपरकर यांनी लगावला.










