
कणकवली : ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक हे मान्य करीत नाहीत. शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांचे नेतृत्वमान्य करून कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत दोन भावांना उतरवले. निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली. नाईक बंधूंच्या विजयात निलेश राणे म्हणाले माझा खारीचा वाटा आहे. मी तर म्हणेन नाईक बंधूंच्या विजयात सिंहाचा वाटा निलेश राणेंचा आहे. त्यामुळे वैभव नाईक यांनी हिम्मत असेल दोन्ही नाईक बंधूंना राजीनामा द्यायला सांगा, आम्ही दोन्ही ठिकाणी पराभूत करू, असे खुले आव्हान माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिले आहे.
कणकवली येथे माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. नलावडे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह््यातील जनता मुर्ख नाही. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत आमदार निलेश राणे यांच्या खांद्याला खांदा लावून वैभव नाईक हे काम करीत होते. आता जनतेला मूर्ख बनविण्यासाठी नगरसेवक पदांचा राजीनामा देतो, असे वैभव नाईक सांगत आहे, मगच हिम्मत असेल तर नाईक बंधूंनी राजीनामा द्यावा. माझी चॅलेंज आहे. नाईकांनी दोन्ही ठिकाणी राजीनामे द्यावेत, फक्त आमदार निलेश राणे यांचे नेतृत्व व सहकार्य घ्यायचे नाही. तुम्हाला दोन्ही जागांवर पराभूत करून दाखवतो, तुम्हाला जनता मूर्ख वाटते का? कणकवली नगरपंचायत निवडणुकीत निलेश राणेंचे पैसे घेऊन निवडणुक जिंकलात, निलेश राणेंचे पैसे चालतात? जनतेला मूर्ख बनवता का? द्या राजीनामा...लढवूया निवडणूक, कोण निवडून येतोय? वैभव नाईकांनी निलेश राणेंच्या नेतृत्वात जिंकलो हे मान्य केले पाहिजे. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत निलेश राणे मिटिंगा घेत होते. त्यावेळी व्यासपीठ वैभव नाईक, सुशांत नाईक उपस्थित असल्याचा आरोप नलावडे यांनी केला.
निलेश राणेंचे नेतृत्व नाईकांनी स्वीकारल्यामुळे अबिद नाईक यांच्या सारखा प्रामााणिक कार्यकर्ता पडला. २००८ सालानंतर पुन्हा नाईकांना कणकवलीचे उपनगराध्यक्षपद हे कोणामुळे मिळाले. उपनगराध्यक्षपदी सुशांत नाईक बसले हे केवळ निलेश राणेंच्या मुळे बसले आहेत,हे नाईकांनी मान्य केले पाहिजे, त्यात लाज वाटण्याची गरज काय? निलेश राणे काल काय बोलले ? त्याचे मी समर्थन करीत नाही, परंतु त्यांची चूक काय आहे? कणकवली नगरपंचायत निवडणूक निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली लढली गेली. त्यांच्यामुळे नाईकांच्या घरातील उपनगराध्यक्ष झाला. २००८ पूर्वी नाईकांच्या घरातील उपनगराध्यक्ष होता. राणेंचे नेतृत्व मान्य केल्यामुळे उपनगराध्यक्षपदाच्या खुर्चीत बसलात, असे प्रत्युत्तर वैभव नाईक यांच्या टीकेला माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिले.










