
कुडाळ : आंब्रड मध्ये गेल्या मार्च महिन्यापासून सातत्याने कमी दाबाने आणि खंडित वीज पुरवठा होत असल्याने नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. याबाबत ओरोस व पेंडूर येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने अखेर आंब्रड ग्रामपंचायतीने महावितरणला निर्वाणीचा इशारा दिला आहे. येत्या ३० मे पर्यंत वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आणि प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यास महावितरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. याबाबत ग्रामपंचायत आंब्रडच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या (महावितरण) कुडाळ येथील अधीक्षक अभियंत्यांना एक पत्र सादर करण्यात आले आहे. या पत्रात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत.
कसाल फिडरवरून सोनवडे पर्यंत होणारा वीज पुरवठा मार्च महिन्यापासून अत्यंत कमी दाबाने होत आहे. यामुळे ग्राहकांच्या घरातील फ्रिज, टीव्ही, एसी, मिक्सर यांसारखी महागडी उपकरणे असूनही वापरता येत नाहीत, उलट कमी दाबा मुळे ती खराब होऊन ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
विजेच्या या लपंडावामुळे शाळेतील मुलांच्या शैक्षणिक नुकसानीसोबतच शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. आंब्रड परिसरासाठी दुसऱ्या वायरमेनची अत्यंत गरज आहे. वारंवार मागणी करूनही अद्याप येथे दुसऱ्या वायरमेनची नियुक्ती करण्यात आलेली नाही. महावितरण कणकवलीकडून होणारा विद्युत पुरवठा अजूनही पूर्ण झालेला नाही, तसेच विद्युत वाहिन्यांवर वाढलेली झाडी तात्काळ तोडण्यात यावी, जेणेकरून तांत्रिक बिघाड होणार नाहीत.
ग्रामपंचायतीने निवेदनात स्पष्ट इशारा दिला आहे की, येत्या ३० मे पर्यंत दुसरा वायरमन न दिल्यास आणि वीज पुरवठा सुरळीत न केल्यास आंब्रडवासीय महावितरण कार्यालयासमोर तीव्र उपोषण करतील. तसेच, या मागण्यांची गांभीर्याने दखल न घेतल्यास आंब्रड जिल्हा परिषद मतदारसंघातील महावितरणच्या एकाही कर्मचाऱ्याला काम करू दिले जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.










