LIVE UPDATES

गोवा मांद्रे मारहाण प्रकरणाचे सीमेवर पडसाद

अर्धा तास वाहतूक रोखली | पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर महामार्ग सुरळीत
Edited by: विनायाक गांवस
Published on: May 25, 2026 19:09 PM
views 470  views

सावंतवाडी : गोवा मांद्रे येथील समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी गेलेल्या सिंधुदुर्ग तळवडे येथील परब कुटुंबावर झालेल्या बाचाबाची दरम्यान मांद्रेतील तरूणांनी मारहाण केली. गोवा पोलिसांना यानंतर तक्रार दाखल करून न घेतल्याने व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे लक्ष वेधूनही दखल न घेतल्याने सिंधुदुर्गच्या सीमेवर मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक तब्बल अर्धा तास रोखून धरण्यात आली. युवा सैनिकांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेतला. बांदा पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर दोन्हीबाजूची वाहतूक सुरळीत करण्यात आली.

मुंबई-गोवा महामार्गावर सिंधुदुर्गच्या सीमेवर महाराष्ट्र व गोवा राज्यातून होणारी वाहतूक रोखून धरण्यात आली. तब्बल अर्धा तास वाहतूक रोखण्यात आली होती. यामुळे दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी युवा सेनेचे, माजी मंत्री आम. दीपक केसरकर यांचे स्वीय सहाय्यक सुरज परब यांनी आक्रमक पवित्रा घेतला. माझ्यासह आमच्या कुटुंबातील व्यक्तींना गोव्यात ४० हून अधिक जणांनी दारूच्या नशेत मारहाण केली. माझ्या डोक्यावर बाटलीने वार केला. ५ वर्षांच्या लहान मुलीसह महिलांवरही त्यांच्याकडून हल्ला करण्यात आला. त्यांनाही धक्काबुक्की केली गेली. मात्र, गोवा पोलिसांना याबाबत माहिती देऊन देखील कोणतीही दखल घेतली नाही. उलट रात्रीच्या सुमारास नशेतच असतील. यात तुम्हालाच त्रास होईल असं गोवा पोलिसांकडून सांगण्यात आल्याची माहिती श्री. परब यांनी दिली. तसेच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचही लक्ष वेधले होते. मात्र,त्यांच्याकडूनही दखल घेतली न गेल्याने बाजूची वाहतूक रोखली. जोपर्यंत संबंधितांना पोलिस ताब्यात घेत नाहीत तोवर एकही गाडी पुढे जाऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला. 

यानंतर जवळपास अर्धा तास दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प होती. बांदा येथील काही नागरिकांकडून रूग्णवाहिकेला होणारा अडथळा बघता वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच सिंधुदुर्गतून होणारी वाहतूक सुरळीत करावी अशी भूमिका घेतली. यानंतर काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रसंगी बांदा पोलिस निरीक्षक पंकज शिंदे यांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती हाताळली. पोलिस प्रदीप नाईक यांसह बांदा‌ पोलिसांनी हस्तक्षेप करत महामार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करून दिला. परब कुटुंबाची बाजू आम्ही ऐकून घेतली असून त्यांच्याकडून तक्रार अर्ज घेतला जाईल व पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती बांदा पोलिस निरीक्षक श्री. शिंदे यांनी दिली. जवळपास अर्धा तास वाहतूक बंद ठेवल्याने मुंबई-गोवा महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वाहतूक सुरळीत झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, रोटी- बेटीच नात गोवा-सिंधुदुर्गच राहील आहे. यात गोवा अन् सिंधुदुर्गच्या तरुणांत पेटलेली ही ठिणगी बघता यात गोवा अन् महाराष्ट्राचे मंत्री कोणती भूमिका घेतात ? दोन्ही भागात निर्माण झालेला हा तणाव कसा निवळतात ? याकडे लक्ष लागून राहिले आहे.