
कुडाळ : "महावितरणतर्फे बसवण्यात येणारे स्मार्ट मीटर हे ग्राहकांच्या फायद्याचेच असून, ग्राहक कुठल्या वेळेत विजेचा किती वापर करतो त्यानुसार त्याचे बिल आकारले जाईल. जर ग्राहकांनी सकाळी ९ ते दुपारी ५ या वेळेत विजेचा वापर केला, तर त्यांना प्रति युनिट ८० पैसे रिबेट (सवलत) मिळणार आहे," अशी महत्त्वपूर्ण माहिती महावितरणचे सिंधुदुर्ग जिल्हा अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांनी दिली आहे. वीज ग्राहक संघटनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर त्यांनी महावितरणची बाजू मांडत ग्राहकांच्या शंकांचे निरसन केले.
स्मार्ट मीटरबाबत कोणाच्याही मनात काही शंका किंवा गैरसमज असल्यास महावितरण त्याचे पूर्ण निरसन करण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीत ग्राहकांनी 'महावितरणचे अधिकारी फोन उचलत नाहीत' अशी तीव्र तक्रार केली होती. याची गंभीर दखल घेत अधीक्षक अभियंता राख यांनी, जिल्ह्यातील सर्व महावितरण अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक सामान्य जनतेसाठी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले. तसेच, ग्राहकांनी कोणत्याही तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक १९१२ किंवा कंट्रोल रूम क्रमांक ७८७५७६५०१९ यावर संपर्क साधावा, असे आवाहन केले. या क्रमांकांवर होणाऱ्या तक्रारी ऑनलाइन नोंदवल्या जात असल्याने त्या वेळेत सुटतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
ग्राहकांनी आपल्या वीजबिलावर असलेले मोबाईल नंबर चुकीचे असल्यास ते तातडीने अपडेट करावेत, जेणेकरून महावितरणचे सर्व महत्त्वाचे मेसेज आणि माहिती मोबाईलवर उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले. वीज ग्राहकांनी महावितरणवरील भार कमी करण्यासाठी आणि स्वतःचे बिल वाचवण्यासाठी सरकारच्या सोलर घर योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या योजनेची माहिती देताना राख म्हणाले की:
३ किलोवॅटपर्यंतच्या सोलर प्रकल्पांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. १० किलोवॅटपेक्षा वरील प्रकल्पांना शुल्क आकारण्यात येणार आहे.
एकूण ५०,००० रुपये किमतीचा १ किलोवॅट सोलर पॅनल विथ बॅटरी सेट केवळ नाममात्र दरात उपलब्ध आहे. यामध्ये बीपीएल (BPL) ग्राहकांसाठी फक्त २,००० रुपये, एससी-एसटी (SC/ST) ग्राहकांसाठी ५,००० रुपये, तर सर्वसाधारण (General) ग्राहकांसाठी १०,००० रुपये खर्च असून उर्वरित रक्कम सरकार देणार आहे.
"वीज ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे. आपण आहात तर आम्ही आहोत. महावितरणची संपूर्ण टीम ग्राहकांच्या सेवेसाठी १०० टक्के उपलब्ध आहे," असे भावनिक आवाहन अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांनी शेवटी केले.










