
सावंतवाडी : भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि वाढते हल्ले या पार्श्वभूमीवर सावंतवाडी बाजारामध्ये मिशन रेबीजतर्फे जनजागृती कार्यक्रम करण्यात आल. मिशन रेबीज या संस्थेतर्फे शनिवारी सावंतवाडी बस स्थानक आणि आज सावंतवाडी बाजारपेठ येथे रेबीज जनजागृती करण्यात आली.
यामध्ये संस्थेच्या टीमने पथनाट्य तसेच बाहुल्यांच्या खेळाच्या माध्यमातून नागरिकांना रेबीज या जीवघेण्या आजाराबाबत माहिती दिली. कार्यक्रमादरम्यान नागरिकांना रेबीज कसा होतो ? त्यापासून स्वतःचा व कुटुंबाचा बचाव कसा करावा, तसेच कुत्रा किंवा इतर प्राण्याने चावा घेतल्यास तात्काळ कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी माहितीपत्रकांचेही वितरण करण्यात आले. मिशन रेबीज ही संस्था गेली कित्येक वर्षे सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला तालुक्यांमध्ये रेबीज रोग प्रतिबंधात्मक लसीकरण करते आहे. प्रत्येकाने स्वतःचे व आपल्या कुटुंबाचे रेबीजपासून संरक्षण करावे आणि इतरांनाही याबाबत जागरूक करावे. कुठेही रेबीज संक्रमित किंवा संशयित कुत्रा दिसला तर मिशन रेबीज हेल्पलाईन वर 7744029586 संपर्क करावा असे आवाहन केले. यावेळी संस्थेचे शिक्षण अधिकारी अमित नाईक म्हणाले, येत्या 2030 पर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा रेबीजमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असून सर्वांनी या मोहिमेत सहभागी व्हावे. या जनजागृती कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.










